Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुप्रसिद्ध उद्योजक म्हैसकर कालवश

सुप्रसिद्ध उद्योजक म्हैसकर कालवश

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:15AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

आयआरबीचे संस्थापक प्रसिद्ध उद्योजक आणि डोंबिवली जिमखान्याचे आधारस्तंभ डी.पी. म्हैसकर याचे दीर्घ आजाराने बुधवारी रात्री 8 वाजता निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. डोंबिवलीत जन्म झालेले दत्तात्रय म्हैसकर मध्यमवर्गातूनच आले होते. सिव्हिल  इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतल्यानंतर म्हैसकरांनीही 1960 पासून पुढची जवळजवळ 17 वर्षे नोकरी केली. परंतु नोकरीतच अडकून न पडता अवघ्या तीन लाख रुपयांच्या भांडवलदार त्यांनी 1977 मध्ये आयआरबीची स्थापना केली आणि नंतर रस्तेबांधणीतील त्यांच्या कारकीर्दीस प्रारंभ झाला.

साधारण 1988-89 च्या सुमारास ‘आयआरबीला पुणे-अहमदनगर (120 किलोमीटर) व अकोला-हिंगोली (90 किलोमीटर) अशी कामे एकाच वेळी मिळाली. ही कामे वेळेआधीच पूर्ण करून त्यांनी एक वेगळा विक्रम केला. 

म्हैसकर यांचे दोन पुत्र वीरेंद्र व जयंत चांगल्या प्रकारे शिकून हाताशी आले. या काळात म्हणजे 1994 च्या सुमारास त्यांनी खराब रस्त्यांची दुरुस्ती करून तो चांगल्या स्थितीत आणणे आणि या कामाचा खर्च टोलच्या उत्पन्नातून करून उर्वरित रक्कम सरकारला देणे अशी संकल्पना मांडून तिचा पाठपुरावा केला. म्हैसकर पितापुत्रांच्या या कल्पनेला चांगला प्रतिसाद लाभला.

सेल्फ फायनान्स करून टोल उत्पन्नाद्वारे त्याची वसुली करून घेणे ही संकल्पना आगळीवेगळी ठरली. आयआरबीच्या माध्यमातून म्हैसकरांनी ही कल्पना केंद्र व राज्य सरकारपुढे सादर केली. त्यांनाही ही कल्पना आवडली, कारण त्यांच्यावर कोणताच आर्थिक बोजा न पडता रस्तेउभारणीसारखी प्रचंड कामे याद्वारे पार पडणे शक्य होणार होते. याद्वारे आयआरबीला अशी 11 कामे मिळाली. त्यांनी ही सर्व कामे दिलेल्या मुदतीपूर्वी आणि यशस्वीरीत्या पार पाडली. ‘बिल्ड-ऑपरेट- ट्रान्स्फर’ तत्त्वावर स्वीकारलेली ही रस्त्यांची सर्व कामे पार पाडताना त्यांच्या देखभालीचीही जबाबदारी संबंधित ठेकेदारास उचलावी लागते. त्यामुळे कामाचा उत्कृष्ट दर्जा बाळगण्याचे बंधन त्यांच्यावर असते. संबंधित रस्त्याचे काम वेळेपूर्वी पूर्ण झाले तर तेथील टोलवसुलीही तातडीने करता येते. हा फायदा ‘आय. आर. बी.’ला चांगल्या प्रकारे मिळाला. 2004 मध्ये आयआरबीला मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाची देखभाल व टोलवसुलीचे काम 15 वर्षांसाठी मिळाले.  या कामांसाठी दत्तात्रय म्हैसकर यांनी आयआरबीच्या वतीने राज्य सरकारला 9 ऑगस्ट 2004 रोजी 918 कोटी रुपयांचा चेक देऊन आणखी एक रेकॉर्ड प्रस्थापित केला.