Tue, Jul 23, 2019 10:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुप्रसिद्ध  बाईक प्रशिक्षक चेतना पंडितची आत्महत्या 

बाईक प्रशिक्षक चेतना पंडितची आत्महत्या 

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी

सुप्रसिद्ध बाईक प्रशिक्षक चेतना नागेश पंडित (27) हिने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. मित्रासोबत ब्रेक अप झाल्याने आपण आत्महत्या करत आहोत, असे तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. चेतनाने ‘धूम’ सिनेमासाठी कतरिना कैफ, ‘जब तक जान’ साठी अनुष्का शर्मा, ‘एक व्हिलन’ साठी श्रद्धा कपूर आणि माधुरी दीक्षितला मोटर सायकल चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. 

मूळची कर्नाटकमधील शिमोगा येथे राहणारी  चेतना गोरेगाव ईस्टमधील पद्मावती नगरमध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये दोन मैत्रिणींसोबत राहात होती.  मंगळवारी मध्यरात्री तिच्या दोन मैत्रिणी फ्लॅटवर पोहोचल्या. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी बेल वाजवली. मात्र अनेकदा बेल वाजवूनही दरवाजा उघडला गेला नाही म्हणून त्यांनी चेतनाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मोबाईल बंद होता. त्यांनी पोलिसांना आणि शेजार्‍यांना याविषयी कळविले. त्यानंतर चावी बनवणार्‍याला बोलावून फ्लॅट उघडण्यात आला.त्यावेळी चेतनाने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी चेतनाला खाली उतरवून गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच चेतनाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

चेतना सध्या एनफिल्ड रायडर्स कंपनीत बाईक रायडरसह प्रशिक्षक म्हणून कामाला होती. पूर्वी तिने एका कॉर्पोरेट कंपनीत काम केले होते. तिने अनेक बाईक रेसिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तिला स्वतःची बाईक घ्यायची होती, खूप पैसे कमवायचे होते, बंगलाही खरेदी करायचा होता, मात्र नोकरीमुळे तिला तिचे स्वप्न पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती, असे सांगितले जाते. 

तिचे एका तरुणावर प्रेम होते, मात्र दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे त्यांचे बोलणे बंद होते. दरम्यान बाईक राईडनिमित्त चेतना बहुतांशी मुंबईच्या बाहेरच राहत असे, असे तिच्या मैत्रिणीच्या जबाबातून समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. 

चेतनाच्या आई-वडिलांचे निधन झाले असून तिला हर्षद नावाचा एक भाऊ आहे. तो शिक्षण घेत असून ताडदेव येथील त्यांच्याच नातेवाइकांकडे तो राहतो.