Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ढोल-ताशांच्या दणदणाटात कन्या जन्माचे स्वागत

ढोल-ताशांच्या दणदणाटात कन्या जन्माचे स्वागत

Published On: Mar 08 2018 5:07PM | Last Updated: Mar 08 2018 5:07PMडोंबिवली : वार्ताहर

एकीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असला तरी अद्यापही स्त्रीभ्रूण हत्येचा डाग काही केल्या जात नाही. या पार्श्वभूमीवर कल्याणातील एका कुटुंबाने मात्र स्त्रीभ्रूण हत्येचा हा डाग पुसण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. कुटुंबात आलेल्या नन्ही परीचे ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. 

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्यापेक्षा कांकणभर सरस कामगिरी करताना दिसत आहेत. संसाराच्या गाड्यापासून ते स्पेसरॉकेट चालवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. एकीकडे ही नवदुर्गा आपल्या बळाच्या जोरावर दशदिशा व्यापून टाकत असताना दुसरीकडे मात्र स्त्रीभ्रूण हत्येच्या माध्यमातून तिला संपवण्यासारखे दुर्दैवी प्रकारही घडत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता कल्याणातील आहेर कुटुंबाने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.

कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा परिसरात हे आहेर कुटूंबिय राहतात. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्याकडे कन्यारत्नाचे आगमन झाले. या नन्ही परीला ढोल-ताशांच्या गजरात घरी आणण्याची तिचे बाबा किरण आहेर यांची इच्छा होती. मात्र, संघर्षमय विजय आणि स्रीजन्म या बहुधा एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात. घरी आणण्याच्या दिवशीच या नन्ही परीला काविळ तर तिच्या आईला डेंग्यू झाल्याने आहेर कुटुंबिय चिंतेत पडले. आई एका रुग्णालयात तर अवघ्या काही दिवसांची ती चिमुरडी एका रुग्णालयात. असे असले तरी शेवटी दोन्हीही शक्तीचीच रूपे आहेत. एक नवदुर्गा तर दुसरी मातृशक्ती. या दोघींनीही आपापल्या आजारांवर मात करत स्त्रीशक्तीचा विश्वास सार्थ ठरवला. 

पूर्वी ठरल्याप्रमाणे या कुटुंबाने आपल्या घरातील नन्ही परीचे ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले. साईराज वाद्य पथकातील मुलींनी या नवदुर्गेचे आणि त्या मतृशक्तीसाठी असे काही वादन केले की ते पाहून सर्वच जण अक्षरशः थक्क झाले होते. एका स्त्रीशक्तीने या जगात नुकत्याच आलेल्या दुसऱ्या एका स्त्रीशक्तचे अशाप्रकारे केलेले स्वागत हे जितके दुर्मिळ तितकेच स्वागतार्ह म्हणावे लागेल. आहेर कुटुंबियांच्या या सुंदर संकल्पनेला साईराज वाद्य पथकानेही कोणतेही मानधन न घेता उत्स्फूर्त साथ दिली. तर आहेर कुटुंबियांनी समाजातील नकोशीला हवीशी करण्यासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे करावे तेवढे कौतुक कमीच ठरेल. स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक कायमचा पुसण्यासाठी आज आपल्या समाजाला अशा शेकडो, हजारो सकारात्मक भूमिकांची नितांत गरज आहे.