Tue, Jul 23, 2019 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चार फ्लॅटस् तब्बल 240 कोटींना

चार फ्लॅटस् तब्बल 240 कोटींना

Published On: Feb 23 2018 8:32AM | Last Updated: Feb 23 2018 8:32AMमुंबई : प्रतिनिधी

घर पहावे बांधून आणि लग्‍न पहावे करून, असे म्हणतात. मुंबईसारख्या शहरात घर बांधणे ही आता अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. दक्षिण मुंबई ही तर महागड्या घरांची पंढरीच. या परिसरात नुकताच सदनिकांचा एक व्यवहार झाला. या घरांसाठी खरेदीदाराने प्रतिचौरस फुटासाठी मोजलेली रक्‍कम डोळे पांढरे करणारी आहे. नेपियन-सी रोड येथे बांधण्यात येत असलेल्या एका टॉवरमध्ये तपाडिया कुटुंबीयांनी तब्बल 1 लाख 20 हजार रुपये प्रतिचौरस फूट दराने किंमत मोजून चार घरे खरेदी केली आहेत. प्रत्येक फ्लॅटचा कार्पेट एरिया 4 हजार 500 चौरस फूट असून, हा एकूण व्यवहार 240 कोटी रुपयांचा आहे.

रुणवाल ग्रुप या टॉवरची निर्मिती करीत आहेत. तपाडिया यांनी घेतलेल्या या सदनिका 28 आणि 31 व्या मजल्यावर आहेत. हा टॉवर किलाचंद हाऊसकडे आहे. अर्ध्या एकरात पसरलेला हा दुमजली बंगला होता. तो 1918 साली बांधण्यात आला होता. 2011 साली रुणवाल ग्रुपने ही जागा 350 कोटी रुपयांना खरेदी केली. मूळ व्यवहार 270 कोटी रुपयांना ठरला होता. मात्र, या बंगल्यात भाड्याने राहणार्‍या लिलानी कुटुंबाने बंगला रिकामा करण्यासाठी 80 कोटी रुपयांची मागणी केली होती.

तपाडिया यांच्याकडे फॅमी केअर या गर्भनिरोधक औषधांच्या कंपनीची मालकी होती. तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपली कंपनी 6 हजार 600 कोटी रुपयांना विकली. मुंबईत सर्वाधिक कर भरणार्‍या कुटुंबात तपाडिया कुटुंबाचा समावेश होतो. बुधवारी तपाडिया कुटुंबाकडून वाडिया गांधी या कायदा सल्‍लागार कंपनीमार्फत एक जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती, आणि रुणवाल समूहाशी होणार्‍या कराराची माहिती देण्यात आली. या चार सदनिकांच्या व्यवहाराबरोबरच तपाडिया कुटुंब 28 कार पार्किंगचा स्लॉटही खरेदी करणार आहे.

अलीकडचे मोठे व्यवहार

 2015 साली अल्टामाऊंट रोडवरील लोढा अल्टामाऊंट या इमारतीत 10 हजार चौरस फुटांवरील ड्युप्लेक्स फ्लॅटची जिंदाल कुटुंबीयांकडून 160 कोटी रुपयांना खरेदी.

 2015 साली उद्योजक सायरस पुनावाला यांनी ब्रीच कँडी परिसरातील एका बंगल्यासाठी 750 कोटी रुपये मोजले.

 2015 सालीच पटनी कॉम्प्युटर्सच्या मालकांनी नेपियन सी रोडवरील रुणवालच्या द रेसिडेन्स या इमारतीतील 3 मजले 200 कोटी रुपयांना खरेदी केले.

 2015 साली इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी वरळीतील समुद्र महल या इमारतीतील सी फेसिंग सदनिकेसाठी 22.5 कोटी रुपये मोजले.