Thu, Jul 18, 2019 00:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीत कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या  

अंधेरीत कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या  

Published On: Jul 26 2018 1:35AM | Last Updated: Jul 26 2018 12:36AMमुंबई : प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून ममता विकास राठोड या अठरा वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने हत्या केली. हत्येनंतर पळून गेलेल्या विकास बाबू राठोडला बुधवारी सकाळी अंधेरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने मंगळवार 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

तक्रारदार चंदन मानसिंग राठोड यांना 9 मुले असून ममता ही सर्वात मोठी आहे. तिचे दहा महिन्यांपूर्वी विकाससोबत विवाह झाला होता. विवाहानंतर ती तिच्या पतीसोबत अंधेरीतील गुंदवली परिसरात राहत होती. गेल्या काही दिवसांपासून विकास हा ममताला तिच्या घरातून 25 हजार रुपये आणण्यास सांगत होता. घराच्या दुरुस्तीसाठी पैशांची गरज असल्याने तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. मात्र चंदन राठोड यांची आर्थिक मदत करण्याची कुवत नसल्याने त्यांनी त्याला पैसे दिले नव्हते. या कारणावरून विकास ममतासोबत सतत वाद घालत होता. अलीकडेच ममताला विकासचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले होते. आर्थिक आणि घरगुती वाद आणि विवाहबाह्य संबंधातून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता या दोघांमध्ये प्रचंड शाब्दिक वाद झाला होता. याच वादातून राधाकृष्णन क्रॉस लेन, कनिका इमारतीजवळ विकासने ममतावर चाकूने वार केले. गळ्यावर वार झाल्याने ती गंभीररित्या जखमी झाली होती. 

जखमी अवस्थेत तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर विकास राठोड तेथून पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ममताचे वडील  चंदन मानसिंग राठोड यांच्या तक्रारीवरुन अंधेरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर पळून गेलेल्या विकासला काही तासांत अटक करण्यात आली. सध्या तो पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.