Fri, May 24, 2019 02:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खोट्या सही-शिक्क्यांनी  29 रजिस्ट्रेशन?

खोट्या सही-शिक्क्यांनी  29 रजिस्ट्रेशन?

Published On: Jul 11 2018 1:37AM | Last Updated: Jul 11 2018 12:42AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या 27 गावांत अवैध बांधकामांचे पेव फुटले आहे. या इमारतींतील घरांच्या दस्त नोंदणीवर बंदी घालण्यात आली असली तरी डोंबिवलीच्या दस्त नोंदणी कार्यालयात खोट्या-सही शिक्क्यांच्या आधारे एका दिवसांत 29 रजिस्ट्रेशन अर्थात दस्त नोंदवल्याची पोस्ट वजा ब्रेकींग न्यूजने मंगळवारी सकाळपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. मात्र, सह दुय्यम निबंधक तथा रजिस्टार उमेश शिंदे यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.

खोट्या-सही शिक्क्यांच्या आधारे एका दिवसात मारले 29 रजिस्ट्रेशन. राज्यपाल, शासनाचे आदेश रजिस्टार उमेश शिंदे यांनी मारले धाब्यावर. अनधिकृत बांधकाम करणारा ए. के. सिंग व ठराविक 2 बिल्डरांचे अनधिकृत बांधकामाचे रजिस्ट्रेशन, शासकीय व संरक्षण दलाच्या जमिनीवरतींही खोटे 7/12 उतारे लावून रजिस्ट्रेशन, अब्जावधी शासकीय कराची लयलूट, 32 अनधिकृत फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसाठी टोकन, अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन हे फक्त प्रियांका मॅडम (एजंट) च्या मार्फत शिंदे करीत आहे. 

एका दिवसात खोट्या स्वाक्षर्‍यांच्या सहाय्याने शिक्क्यांच्या आधारे प्रत्येकी दस्तऐवजा मागे 1, 25, 000 रुपये घेऊन व रेरा रजिस्टर बांधकामाचे रजिस्ट्रेशन बाजूला ठेवून अनधिकृत बांधकामाचे रजिस्ट्रेशन शिंदे युद्धपातळीवर करीत आहेत. अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची कल्याण पश्चिमेतील खडकपाड्यात 2, डोंबिवलीत 2 आणि कल्याण पूर्वेतील मलंगरोड परिसरात एक अशी एकूण 5 सह दुय्यम निबंधक वर्ग 2 ची कार्यालये आहेत. कल्याण तालुका परिक्षेत्रातील घरे, दुकाने, व्यापारी गाळे, आदी ठिकाणी मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचे पाच कार्यलयांमध्ये रजिस्ट्रेशन होते. 

काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अवैध बांधकामांची यादी जाहीर केली आहे. या बांधकामांतील कोणतीही घरे वा व्यापारी गाळे नागरिकांनी खरेदी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः 27 गावांत फोफावलेल्या अवैध बांधकामांशी नागरिकांनी कोणताही व्यवहार करू नये, यासाठी केडीएमसीने दुय्यम निबंधक कार्यालयांशी अवैध बांधकामांच्या यादीसह पत्रव्यवहार केला आहे. मात्र डोंबिवली पूर्वेकडे गांधीनगरमध्ये तर्टे प्लाझा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात अवैध इमारतीतीलही स्थावर मालमत्तांचे रजिस्ट्रेशन राजरोसपणे सुरू असल्याचे या पोस्टने उघड्यावर आणले आहे. मात्र, या कार्यालयातील सह दुय्यम निबंधक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला. 

काही एजंटांच्या अंतर्गत स्पर्धा वजा भांडणातील हा प्रकार आहे. बिल्डरांचे काम माझ्याकडे कसे येईल, यासाठी माझ्या नावाचा वापर करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट  2017 रोजी आपण रूजू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 500 व्यापारी गाळे, सदनिका, आदींचे रजिस्ट्रेशन केले आहे. केडीएमसीने अनधिकृत बांधकामांची गेल्याच आठवड्यात यादी या कार्यालयांना दिली आहे. 27 गावांतील अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन बंद आहेच, शिवाय त्याप्रमाणे केडीएमसी हद्दीतील बांधकामांचेही रजिस्ट्रेशन बंद करण्यात आल्याचे सह दुय्यम निबंधक शिंदे यांनी सांगितले. 

32 अनधिकृत फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसाठी टोकन देण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार करताना ते म्हणाले, मंगळवारी अवघी 13 टोकन वितरीत केले असून त्यात केडीएमसीने दिलेल्या यादीतील एकही इमारतीचा उल्लेख नसल्याचा दावा शिंदे यांनी केला. विशेष म्हणजे नोंदणी अधिनियम व नियमानुसार  निबंधकांना कोणतेही दस्त तपासण्याचा मुळात अधिकारच नाही. तरीही केडीएमसीने दिलेल्या अनधिकृत बांधकाम यादी संदर्भात दस्त नोंदवायचे किंवा कसे याचे वरिष्ठांकडून अभिप्राय मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.