Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारखाने घोटाळा; तक्रारीचे काय झाले?

कारखाने घोटाळा; तक्रारीचे काय झाले?

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:22AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने डबघाईला आणत त्यांची मालमत्ता कवडीमोल भावाने स्वत:च्या पदरात पाडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या तक्रारीचे काय झाले, असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. या प्रकरणी काय तपास झाला अशी विचारणा करीत न्यायालयाने या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला एका आठवड्यात यासंबंधी माहिती देण्याचे आदेश दिले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीने अ‍ॅड.सतीश तळेकर आणि अ‍ॅड. विनोद सांगवीकर यांनी या गैरव्यवहाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणार्‍या दोन दिवाणी जनहित याचिकांसह तीन याचिका दाखल केल्या आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे माजी मंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बड्या राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने डबघाईला आणले आणि त्यानंतर त्यांची कवडीमोलाने विक्री केली आणि हे कारखाने स्वत:च खरेदी करून राज्य सरकारला सुमारे 25 कोटींच्या खाईत लोटले, असा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. 

या याचिकांवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर आज एकत्रित सुनावणी झाली.  यावेळी याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड.सतीश तळेकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन ,मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली. परंतु त्यावर उद्याप कोणतीच कारवाई झाली नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला एका आठवड्यात माहिती देण्याचे आदेश देऊन सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत तहकूब केली. राज्यातील हा खूप मोठा घोटाळा असून याविषयी कॅगसह कित्येक समित्यांच्या अहवालांमध्ये परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्यामुळे त्याआधारे याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.