Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारखाने, डम्पिंग, वाहनांनी बिघडवली मुंबईची हवा

कारखाने, डम्पिंग, वाहनांनी बिघडवली मुंबईची हवा

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 04 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत सुरू असलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांतून निघणारा प्रदूषित धूर, मुलुंड, देवनार व कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडला लागणार्‍या आगी, गेल्या दशकात वाढलेली वाहनांची संख्या, बिल्डर व विविध प्रकल्पांसाठी तोडण्यात येणार्‍या झाडे, कांदळवन तोडून टाकण्यात येणारा भराव यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत प्रदूषण रोखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील प्रदूषणात घट झाल्याचा दावा, पालिकेच्या पर्यावरण विभागाने केला आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगभरात प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली असून यात  टॉप 10 प्रदूषित महानगरांमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील प्रदूषणात का वाढ झाली, याला वाढत्या वाहनांच्या संख्येसह मुंबईत वरळी, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, मालवणी, घाटकोपर, गोरेगाव आदी भागांत वाढलेले छोटे कारखाने व अंधेरी एमआयडीसी, चेंबूर, माहूल भागातील औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणीय प्रदूषणाचा प्रादुर्भाव होत आहे. 

देवनार व मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर सतत लागणार्‍या आगींमुळे मुंबई शहर विशेषत: मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, कांजूर आदी भाग प्रदूषित धुरामध्ये गडप होताना दिसून येत आहे. 
वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारामध्ये वाढ होत असल्याचे पालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात उघडकीस आले होते. धूलिकणांमुळेही प्रदूषणात वाढ होताना दिसून येत आहे. त्याशिवाय ध्वनिप्रदूषण, नाल्यातून वाहणारे सांडपाणी, शौचालयाची अपुरी व्यवस्था, कांदळवण कापून भराव टाकण्याचे वाढलेले प्रमाण व मेट्रो रेल्वेसह अनेक प्रकल्पांसाठी करण्यात येणारी वृक्षतोडही प्रदूषणाला कारणीभूत आहे.

वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांना पोल्युशन अंडर कंन्टोल (पीयूसी) सक्तीची करण्यात आली. हवेच्या दर्जाची स्थिती तपासण्यासाठी पालिकेने वरळी, खार, अंधेरी, भांडुप व मरवली येथे केंद्रे उभी केली आहेत. येथे सल्पर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया व तरंगते धूलिकण यांचे सर्वेक्षण करण्यात येते. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मानाकांच्या तुलनेत सल्पर डायऑक्साईड व अमोनियाचे प्रमाण कमी झाले असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून सांगण्यात आले. 

Tags :Mumbai, Factory, dumping, vehicular, disrupted, Mumbai