Thu, Apr 25, 2019 13:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेसबुकवर बोगस प्रोफाईलद्वारे तरुणीची बदनामी

फेसबुकवर बोगस प्रोफाईलद्वारे तरुणीची बदनामी

Published On: Mar 04 2018 2:09AM | Last Updated: Mar 04 2018 2:09AMमुंबई : प्रतिनिधी

फेसबुकवर बोगस प्रोफाईल बनवून एका अठरा वर्षांच्या तरुणीविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो अपलोड करून तिचा कॉलगर्ल म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी जयानंद अर्जुनराव कानपुरे या 33 वर्षीय आरोपीस सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्याविरुद्ध अपहरणासह सामूहिक बलात्कार आणि पोस्कोच्या एका गुन्ह्यांची नोंद आहे. 

याच गुन्ह्यात तो सध्या न्यायालयीन कोठडीत तळोजा कारागृहात बंदिस्त होता. त्याचा ताबा घेऊन त्याला या गुन्ह्यात अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. जयानंद हा भांडुप येथील टाटानगर, सद‍्गुरू चाळीत राहतो. गेल्यावर्षी त्याच्याविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कारासह पोस्कोच्या एका गुन्ह्यांची ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो तळोजा कारागृहात   होता.  त्याने एका 18 वर्षांच्या तरुणीचा फेसबुकवर बोगस प्रोफाईल तयार केला होता. या प्रोफाईलमध्ये तिचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि काही महिलांचे अश्‍लील फोटो अपलोड करून तिचा अप्रत्यक्षपणे कॉलगर्ल म्हणून उल्लेख केला. त्यानंतर या तरुणीला सतत विविध व्यक्तीकडून फोन येऊ लागले. तिच्याशी अश्‍लील संभाषण करुन संबंधित व्यक्तीला तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलावत होते. एका व्यक्तीने तिच्याविषयीची फेसबुकवरील माहिती सांगितली. त्यानंतर तिने स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. 

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यांचा समांतर तपास सायबर सेलचे अधिकारी करीत होते. आयपी अड्रेसवरून पोलिसांनी ही प्रोफाईल भांडुप येथून बनवण्यात आला होती याची माहिती काढल्यानंतर जयानंद कानपुरे याचा या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला. चौकशीत तो तळोजा कारागृहात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर त्याचा कोर्टातून ताबा घेऊन त्याला  पोलिसांनी अटक केली. आपल्या जबानीत त्याने या तरुणीचे फेसबुकवर बोगस प्रोफाईलवर बनवल्याची तसेच तिची बदनामी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टाने 8 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.