होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेसबुक फ्रेन्डचे वाढदिवसाचे गिफ्ट पडले महागात

फेसबुक फ्रेन्डचे वाढदिवसाचे गिफ्ट पडले महागात

Published On: Feb 11 2018 2:35AM | Last Updated: Feb 11 2018 2:27AMमुंबई : अवधूत खराडे

वाढदिवसाचे गिफ्ट पाठवले असल्याची बतावणी करत ठगांनी 27 वर्षीय विवाहितेला कस्टम क्लिअरन्स करण्यासोबच एटीएस आणि इन्कमटॅक्स विभागांकडून कारवाईची भीती घालत तब्बल 10 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विवाहितेला एका अनोळखी फेसबूक फ्रेन्डने हा चूना लावला असून तिला फेसबूक प्रेम चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन आग्रीपाडा पोलीस तपास करत आहेत.

भायखळ्यातील सातरस्ता परिसरात सिंग कुटूंबिय वास्तव्यास असून आरती (27) हिच्या डॉक्टर पतीचे स्वतःचे क्लिनीक आहे. 16 जानेवारी रोजी आरतीला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. डेवीड मार्क असे या फे्रेन्डरिक्वेस्ट पाठवणार्‍या व्यक्तीचे नाव होते. युकेमध्ये बी. एम. डब्ल्यु. कंपनीमध्ये नोकरीस असल्याची बतावणी करणार्‍या डेवीडची फ्रेन्डरिक्वेस्ट आरतीने स्विकारली.

दोन दिवस फेसबुक मॅसेंजरवर बोलल्यानंतर डेवीडने तिच्याकडे व्हॉटअ‍ॅप नंबर मागितला. त्याच्यावर विश्‍वास ठेवत आरतीने त्याला नंबरही दिला. याच दरम्यान 21 जानेवारीला आरतीचा वाढदिवस असल्याचे फेसबुकच्याच माध्यमातून डेविडला समजले. त्याने हीच संधी हेरुन वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आयफोन मोबाईल, तीन हॅन्ड बॅग, ज्वेलरी व 50 हजार पाऊंड विदेशी चलन पाठवत असल्याची छायाचित्रे व्हॉटसअ‍ॅपवर पाठवली. 

डेविड आपल्याला महागडी भेट पाठवत असल्याचे पाहून आरतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. डेविडने गिफ्ट पाठवण्यासाठी घराचा पत्ताही तिने दिला. घरचा पत्ता मिळताच डेविडने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, गिफ्ट पाठवल्याचे तिला सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास आरतीच्या मोबाईल एका महिलेचा फोन आला. कस्टम विभागातून नेहा बोलत असल्याचे सांगणार्‍या महिलेने युकेवरुन डेविड मार्क नावाच्या व्यक्तीने गिफ्ट पाठवल्याचे आरतीला सांगितले.

विदेशातून गिफ्ट आल्याने 30 हजार रुपये कस्टम ड्युटी भरावी लागणार असल्याचे सांगून नेहाने तिला एका बँक खात्याचा नंबर दिला. गिफ्ट मिळणार असल्याने आरतीने लागलीच सांगितलेल्या खात्यावर रक्कम आयएमपीएसद्वारे भरली. आरती आपल्या जाळ्यात अडकल्याचे ठगांच्या लक्षात आले. गिफ्ट मशिनमध्ये स्कॅन झाले असून त्यात विदेशी चलन असल्याने गिफ्ट मिळण्यासाठी दंड म्हणून 95,999 रुपये भरावे लागतील, असे आरतीला सांगितले.

आरतीने हे पैसेही तात्काळ भरताच पुन्हा फोन करुन नेहाने 1.72 लाख भरण्यास सांगितले. एवढी रक्कम जवळ नसल्याचे आरतीने सांगताच कस्टम विभागाचा अधिकारी म्हणून जॉर्ज याने हा फोन घेत, पैसे भरले नाही तर पोलीस तुम्हाला अटक करतील, अशी भीती घातली. भीतीपोटी आरतीने ही रक्कमही भरली. दुसर्‍या दिवशी जॉर्ज याने पुन्हा फोन करुन अ‍ॅन्टी टेररीस्ट स्कॉडसोबत (एटीएस) आपले बोलणे झाले असून त्यांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे, असे सांगितले.

एटीएसने तपास सुरू केल्याने आरती चांगलीच घाबरली होती. याचाच फायदा उठवत जॉर्ज याने तिला 1 लाख 9 हजार रुपये तात्काळ दिलेल्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. आरतीने हे पैसे भरताच जॉर्ज याने फोन करुन गिफ्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळाल्याचे सांगितले. गिफ्टमध्ये असलेले 50 हजार पाऊंडस म्हणजे भारतीय चलनातील ही रक्कम 45 लाख रुपये होत असून ते आरतीच्या बँक खात्यात भरण्यासाठी 2 लाख 59 हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे मिळणार या आशेपोटी आरतीने पुढच्या दोन दिवसांत ही रक्कम भरलीसुद्धा. तीने पैसे भरताच जॉर्जने पुन्हा फोन करुन एटीएसचे पथक तुमच्या आई-वडिलांना या गुन्ह्यात अटक करणार असल्याचे सांगितले. यामुळे चांगल्याच घाबरलेल्या आरतीने आई-वडिलांना यात न गोवण्याची विनंती केली. यासाठी आणखी 3 लाख 40 हजार रुपये भरावे लागतील, असे आरतीला सांगितले. आरतीने भीतीपोटी ही रक्कमसुद्धा भरली. 

ठगांनी अवघ्या दहा दिवसांत आरतीकडून तब्बल 10 लाख 5 हजार 999 रुपये उकळले होते. अखेर 31 जानेवारीला जॉर्जने गिफ्ट पाठवायला हरकत नसल्याचे सांगत इन्कम टॅक्स म्हणून 7 लाख 59 हजार रुपये भरावे लागतील, असे आरतीला सांगितले. तेव्हा आपली फसवणूक होत असल्याचे आरतीच्या लक्षात आले. तिने ही बाब पती आणि भावाच्या कानावर घातली. आरतीची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर या कुटूंबियांनी बुधवारी आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.तक्रारीवरून याप्रकरणी डेविड याच्यासह जॉर्ज व नेहा अशा तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.