Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाप्पाच्या महाप्रसादावर एफडीएची नजर

बाप्पाच्या महाप्रसादावर एफडीएची नजर

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

गणेशोत्सव काळात प्रसादात भेसळ होऊ नये, याची खबरदारी घेत बाप्पाच्या प्रसादावर करडी नजर ठेवण्याचा निर्णय अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे.

सणासुदीच्या काळात मिठाईच्या पदार्थांची मागणी वाढल्यानंतर अधिक पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी विक्रेते पदार्थांमध्ये भेसळ करतात. गेल्या वर्षी बाप्पाच्या प्रसादात भेसळ झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले. यंदा मात्र प्रत्येक प्रभागातील अन्न निरीक्षकांना प्रसादावर लक्ष ठेवण्याच्या सूचना एफडीएकडून देण्यात आल्या आहेत. शिवाय गणेश मंडळांत तयार होणार्‍या प्रसादावर लक्ष ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

गणेश मंडळांसह मिठाई विक्रेत्यांच्या दुकानांचीही तपासणी केली जाणार आहे. गणपती मंडळांनी शक्यतो स्वत: तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे. भक्तांना वाटप करण्यात येणारा प्रसाद पौष्टिक असावा. प्रसादासाठी वापरण्यात येणार्‍या पदार्थांची गुणवत्ता तपासावी. याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना लवकरच माहिती दिली जाणार आहे.  तयार प्रसाद थंड आणि स्वच्छ जागेत ठेवण्याच्या सूचनाही मंडळांना केल्या जाणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाचे सह-आयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे.