Fri, Jan 18, 2019 23:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नद्यांसह समुद्रकिनार्‍यांच्या स्वच्छतेसाठी व्यापक मोहीम

नद्यांसह समुद्रकिनार्‍यांच्या स्वच्छतेसाठी व्यापक मोहीम

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:00AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील कृष्णा व मुळा-मुठा नद्या, मिर्‍या व गणपतीपुळे समुद्र किनारे स्वच्छ केले जाणार आहेत. गोव्यातील मांडवी नदीचीही स्वच्छता केली जाणार आहे. 

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने 19 राज्यातील 24 नद्या आणि 24 समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कृष्णा व मुळा-मुठा या नद्या आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातील मिर्‍या व गणपतीपुळे या समुद्र किनार्‍यांचा समावेश आहे. या स्वच्छता मोहिमेसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 19 टिम बनवल्या आहेत. 

या टीममध्ये केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल विभागाचे वरीष्ठ अधिकारी, राज्यातील नोडल ऐजन्सी,  राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळे, जिल्हा प्रशासन, समुद्र किनारी असणारे मत्स्य महाविद्यालय तसेच अन्य शैक्षणिक, संशोधन संस्थांचाही सामवेश आहे. या टिम स्थानिक शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक समुहांना सोबत घेऊन स्वच्छता मोहिम राबविणार आहेत. 

स्वच्छता मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या नद्या, समुद्र किनारे, तलावांना स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये खर्च करण्यात येईल. निवडण्यात आलेल्या स्थळांच्या आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तुही स्वच्छ करण्यात येतील. ही मोहिम 15 मेपासून सुरू करण्यात आली असून ती 5 जूनपर्यंत राबविली जाणार आहे. या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्‍न मंजुषा, वाद विवाद स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.