Tue, Apr 23, 2019 05:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्सप्रेस वे टोलला १५ वर्षे मुदतवाढ

एक्सप्रेस वे टोलला १५ वर्षे मुदतवाढ

Published On: May 26 2018 1:15AM | Last Updated: May 25 2018 8:09PMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्रस्तावित खोपोली-कुसगाव बायपास रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलची मुदत सन 2030 वरून 2045 पर्यंत वाढवली आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, खोपोली ते कुसगावदरम्यान बांधण्यात येणार्‍या 13.3 कि.मी.च्या बायपाससाठी निधीची आवश्यकता असल्याने एक्स्प्रेस वे वरील टोल संकलनाची मुदत 2045 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रस्तावित बायपास रस्त्याचे कर्ज फेडण्यासाठी टोल संकलनाची मुदत 15 वर्षांनी वाढवण्यात आली असून, टोल दरात प्रत्येक तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्यात येणार आहे. टोल संकलनाची यापूर्वीची अंतिम मुदत 2030 अशी होती.

सध्या मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरून कारने प्रवास करणार्‍यास टोलपोटी 230 रुपये मोजावे लागतात. दर तीन वर्षांनी यात 18 टक्के वाढ केल्यास भविष्यात एका वनवे ट्रिपसाठी कारला एक हजार रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.

याबाबत 24 नोव्हेंबर 2017 च्या ठरावानुसार, खालापूर टोल नाका ते कुसगाव दरम्यानच्या बायपास रस्त्यामुळे 20 मिनिटाचा प्रवास कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने मोठा पूल व बोगद्यासाठी दोन निविदा मागवल्या आहेत.