Thu, Jun 20, 2019 14:40



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहिला हक्क भूमिपुत्रांचा, उत्तर भारतीयांचेही स्वागत

पहिला हक्क भूमिपुत्रांचा, उत्तर भारतीयांचेही स्वागत

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 1:17AM



मुंबई : प्रतिनिधी 

राज्यात भूमिपुत्रांचा प्रथम हक्क असून रोजगारासाठी मेहनत करणार्‍या उत्तर भारतीय लोकांचेही स्वागत केले पाहिजे असे मत उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. 

कांदिवलीत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या मुंबईच्या विकासात आणि कला, क्रीडा,शिक्षा,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी  करणार्‍या उत्तर भारतीय नागरिकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.  
अमरनाथ यात्रेच्या वेळीही बाळासाहेब ठाकरे यांनी परखड भूमिका मांडली होती. आगामी निवडणुका सेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे पाहून आणि आता लोकप्रियता घसरत असल्याने पराभव दिसू लागल्याने त्यांना आता  एनडीएची आठवण येते असल्याची टीका सुभाष देसाई यांनी भाजपावर यावेळी केली. 

बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिक आघाडीवर होते. बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते होते की त्यांनी हे काम शिवसैनिकानी केलं असेल तर याचा मला सार्थ अभिमान वाटतो. असे जाहीरपणे सांगितले होते. केंद्रातील सरकार राममंदिर बनविणार काय असा प्रश्न जनताच विचारत आहे , असे म्हणत देसाई यांनी भाजपाला खडेबोल सुनावले. 

मुंबई प्रमाणेच ठाण्यातील विकासात उत्तर भारतीयांचे योगदान असल्याचे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परप्रांतीयांवर हल्ले होत असताना त्याच्याविरोधात प्रथम प्रकाश सुर्वेनी आवाज उठवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघावर आणि 6 लोकसभा मतदारसंघांवर शिवसेनेने आपले लक्ष केंद्रित केले आहे.त्यामुळे आता मराठी मतदारांबरोबरच आता शिवसेनेने उत्तर भारतीय नागरिकांबरोबर संपर्क ठेऊन त्यांच्या सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात प्रथम मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली.  यावेळी सुमारे 2 हजार पेक्षा अधिक उत्तर भारतीय जनता उपस्थित होते.

Tags : mumbai, mumbai news, Shiv Sena leader Subhash Desai,