Tue, Apr 23, 2019 21:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनकोंडी

एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनकोंडी

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 12:57AM

बुकमार्क करा

खोपोली/ पेण : प्रतिनिधी

नाताळच्या उत्सवाची सुट्टी तसेच सलग लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर आपल्या गावी जाण्यासाठी तसेच सुट्टी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तसेच मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी वाहनांची मोठी गर्दी वाढली होती. या गर्दीने मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा तब्बल 7 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या, यामुळे किमान एक तास प्रवाशांची रखडमपट्टी झाली तर मुंबई-गोवा महामार्गावरही ठिकठिकाणी वाहनकोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला.

शनिवार, रविवार तसेच सोमवारी नाताळ सणाची अनेक शाळांना सुट्टी मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर मुंबईकर पश्‍चिम महाराष्ट्र तसेच कोकणच्या दिशेने आपल्या गावी तसेच पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी बाहेर पडल्याने दोन्ही महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहनकोंडी झाली होती. एक्सप्रेसवेवर किरकोळ अपघाताच्या घटना सोडता सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. सलग लागून सुटट्या आल्याने लोणावळा तसेच खोपोली येथील थीम पार्कला पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. त्यामुळे एक्सप्रेसवेवर बोरघाटात वाहनांची कोडी झाली होती. 

खालापूर  टोलनाक्यापासून  दोन्ही बाजूस 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने आयआरबी कंपनीने खालापूर टोल नाक्यावर अतिरिक्त  5 लेन मधून जादा वाहने  सोडण्यात येत होती.  तर कोकणात तसेच  महाबळेश्‍वरला जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरुन पर्यटक निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. 

मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्तारुंदीकरणाचे काम खोळंबल्याने एकतर्फी महामार्गावरून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे बनले आहे. अनेक ठिकाणी छोटी वाहने पुढे काढण्याच्या नादात वाहतूक कोंडीत भर पडत होती. वाहतूक पोलिसांची यंत्रणा रस्त्यावर असली तरी नियोजनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर करणे त्यांना त्रासदायकच होत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. राष्ट्रीय महामार्गावर खारपाडा ब्रीज, हमरापूर फाटा, पेण अंतोरा फाटा, रामवाडी बसस्थानक, यांसह महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोडींची समस्या उद्भवली होती.