Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाड्याच्या कंपनीत स्फोट; तीन मजूर ठार

वाड्याच्या कंपनीत स्फोट; तीन मजूर ठार

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 1:42AMवाडा : वार्ताहर

वाडा तालुक्यातील कांबारे गावाजवळ असलेल्या तोरणे इस्पात उद्योग प्रा. लि. या कंपनीतील बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याला ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

तोरणे इस्पात उद्योग प्रा. लि. या कंपनीमध्ये लोखंड वितळवून इमारतीच्या बांधकामासाठी लागणार्‍या सळईचे उत्पादन होते. यासाठी मोठी भट्टी पेटवली जाते. या भट्टीत संध्याकाळी चारच्या सुमारास अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यात निलेश यादव (28), सनी रतनलाल वर्मा (28), संजय गुप्ता (27) यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर विनोद यादव (35) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी ठाणे येथे पाठविण्यात आले आहे. सर्व कामगार हे परप्रांतीय असून कारखान्यातील कामगारांच्या असुरक्षिततेचा मुद्दा एकदा ऐरणीवर आला आहे.