Sun, May 19, 2019 21:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उंदीर मारले, घुशींचे काय : विरोधकांचा सवाल 

उंदीर मारले, घुशींचे काय : विरोधकांचा सवाल 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सुरू केलेले मूषकपुराण सरकारची पाठ सोडायला तयार नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन करताना जी आकडेवारी उंदीर मारल्याची म्हणून जाहीर करण्यात आली, ती उंदीर मारण्यासाठी ठेवलेल्या गोळ्यांची असल्याचे सांगितले. त्यावर विरोधकांनी मंत्रालयातील उंदीर मारले  तरी मंत्रालयाला लागलेल्या घुशींचे काय, असा सवाल करून हे पुराण पुढे सुरूच ठेवले.

कामकाज सुरू होताच चंद्रकांत पाटील यांनी निवेदन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 33 टक्के कामे ही मजूर सहकारी संस्थांना दिली जातात. त्यासाठी सहकार विभागाला कळविल्यानंतर केवळ वर्कऑर्डर काढण्याचे काम हे आपल्या खात्याकडून होते. मंत्रालय व विस्तारित इमारतीत उंदीर निर्मूलनासाठी प्रत्येकी  2 लाख 40 हजार रुपयांचे हे काम होते. त्यासाठी 3 लाख 19 हजार 400 गोळ्या पुरविण्यात आल्या. त्यामुळे हे आकडे मारलेल्या उंदरांचे नाहीत, तर ते गोळ्यांचे असल्याचे पाटील म्हणाले. ज्या मजूर संस्थेला हे काम देण्यात आले, त्या संस्थेच्या अस्तित्वाची माहिती घेण्यासाठी पत्र दिल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या या निवेदनावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्यामुळे उंदीर मारण्यात आले असले तरी मंत्रालयाला लागलेल्या घुशींचे काय, असा सवाल करीत मांजरी व बोके सोडले असते तरी उंदरांचा बंदोबस्त झाला असता, अशी टिपणी केली. विधानसभा अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव दाखल केल्याप्रकरणी झालेल्या गदारोळातही विरोधकांनी हे मूषकपुराण जिवंत ठेवत ‘गणपतीचे वाहन मारणार्‍या सरकारचा धिक्‍कार असो,’ अशा घोषणा दिल्या.

Tags : Rats scam issue,  Minister Chandrakant Patil, Pills placed to kill rats statistics,


  •