मुंबई : प्रतिनिधी
वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीत घुसखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी खैरवाडी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करून एका भाडेकरूला अटक केली आहे. सुरज जाधव असे या भाडेकरूचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली. लवकरच शासकीय वसाहतीमधील इतर इमारतीमध्ये अशा प्रकारे घुसखोरी झाली आहे का याबाबत पोलिसांकडून सर्व्हे करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. वांद्रे येथे शासकीय कर्मचार्यासाठी निवासी इमारतीची व्यवस्था करण्यात आली असून या इमारतीमध्ये खासगी व्यक्तींना भाडेतत्त्वावर खोल्या देण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाड्याने दिलेल्या या भाडेकरुची नोंद पोलिसांकडे नसल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना मिळाली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी गंभीर दखल घेत तिथे जाऊन प्रत्येक खोल्यांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर गुरुवारी सकाळी अकरा वाजता पोलीस निरीक्षक कालापाड, उगले, भोसले, चुंबळे, कुंभार व अन्य पोलीस पथकाने शासकीय वसाहतीच्या इमारत क्रमांक दहामधील काही खोल्यांची पाहणी सुरू केली होती. यावेळी तळमजल्यावरील खोली क्रमांक 1835 मध्ये आणि पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 1799 मध्ये काही खासगी व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहात असल्याचे उघडकीस आले. चौकशीअंती 1835 ही खोली जानुबेन किरण डुंगरशी यांना देण्यात आली होती. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने तिच्या मुलाने ही खोली 28 फेब्रुवारी 2018 रोजी खोली मिळकत व्यवस्थापक कार्यालयाच्या ताब्यात दिली होती. असे असतानाच त्यांच्या खोलीमध्ये सुरज जाधव, त्याची पत्नी शीतल जाधव आणि इतर कुटुंबीय राहात असल्याचे उघडकीस आले. त्यांनी या खोलीचे कुलूप तोडून तिथे घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
दुसरीकडे खोली क्रमांक 1799 ही खोली श्रीकांत आढाव यांना वितरीत करण्यात आली असून श्रीकांत हे शिक्षण विभागात कामाला आहेत. त्यांनी ती खोली रमेश शंकर खुडे यांना अकरा हजार रुपयांच्या भाडेतत्त्वावर तसेच पन्नास हजार अमानत रकमेवर दिली होती.