Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहन, दागिने, घरखरेदीची उंच गुढी!

वाहन, दागिने, घरखरेदीची उंच गुढी!

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

गुढीपाडव्यानिमित्त होणार्‍या दागिनेखरेदीत तब्बल 25 टक्क्यांनी वाढ होईल, असा विश्‍वास मुंबईतील विविध सराफांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर वाहनविक्रीमध्येही 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच घरखरेदी 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. 

गेल्या गुढीपाडव्याच्या तुलनेत यावेळी 25 टक्क्यांनी सोनेखरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये गुढीपाडव्याला आठवडाभरात मुंबई शहरात सोन्याच्या विक्रीत सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावेळी 375 ते 400 कोटी रुपयांची रविवार सायंकाळपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता असल्याचे झवेरी बाजार, काळबादेवी येथील सोन्याचे होलसेल व्यापारी जितूभाई जैन यांनी सांगितले. 

दरम्यान आठवडाभरापासून मुंबईतील ज्वेलर्स दुकानात सोनेखरेदीसाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. रविवारी गर्दीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी सोन्याच्या बिस्किटासह बांगडी, हार, अंगठी आदी दागिनेखरेदीवर लोकांचा भर असल्याचे आग्रीपाडा येथील श्री ज्वेलर्सचे विक्रम कुमावत यांनी सांगितले. पालशेतकर ज्वेलर्सचे महेश पालशेतकर म्हणाले, यावर्षी पारंपरिक दागिन्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढलेला दिसत आहे. त्यामुळे पारंपरिक धाटणीचे दागिने अधिक प्रमाणात खरेदी केले जातील. याच्या जोडीला पारंपरिक डिझाइन्सचे परंतु वजनाला हलके असे दागिनेही घेण्याकडे कल वाढेल. सध्या मडल फिनिशफ व मॅट फिनिश प्रकारच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. असे दागिनेही गुढीपाडव्याला अधिक प्रमाणावर खरेदी केले जातील. खोट्या, फॉर्मिंग किंवा गोल्ड प्लेटेड दागिन्याची चमक यंदा काहीशी ओसरलेली दिसते आहे. 

शुक्रवारी बाजार बंद झाला त्यावेळी स्टँडर्ड सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 30,310 रुपये, तर शुद्ध सोन्याचा भाव 30,460 रुपये राहिला. चांदीचा भाव प्रति किलो 38,275 रुपये होता.

गुढीपाडव्यानिमित्त वाहन बाजारात तेजी बघायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील ताडदेव आणि वडाळा आरटीओ कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची नोंद करण्यात आल्याची माहीती आरटीओतील सुत्रांनी दिली. गेल्यावर्षी नोटबंदीचा फटका बसलेली वाहननोंदणी यंदा 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. गुढीपाडव्याला नवीन गाडी घरी नेण्यासाठी मुंबईकरांची गेल्या आठवडाभरापासून टू व्हिलर व फोर व्हिलर शोरूममध्ये गर्दी केली आहे. मुंबईतील साई सर्विससह आदित्य होंडा व अन्य लहान-मोठे शोरूममध्ये नेहमीपेक्षा गर्दी वाढली आहे. त्यामुळे शोरूमने फायनान्स कंपनीला शोरूममध्ये तीन ते चार काऊंटर उघडून दिले आहेत. गाडी खरेदीची संख्या वाढल्यामुळे मुंबईतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी व बोरीवली आरटीओत गाडीच्या नोंदणीसाठी गर्दी होत आहे. रविवारी गुढीपाडव्या दिवशी गाडी नोंदणीसाठी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन आरटीओ सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अंधेरीचे आरटीओ अभय देशपांडे यांनी सांगितले. गेल्या आठवडाभरात मुंबईतील चार आरटीओमध्ये सुमारे 4100 टू व्हीलर्स गाड्यांची  तर, सुमारे 1896 चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याशिवाय टॅक्सी, रिक्षा, बस व अन्य गाड्यांचा समावेश आहे.

 

Tags : vehicles, jewelery, home buying, increase, Expectation, mumbai news