होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्‍महत्या

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्‍महत्या

Published On: May 11 2018 2:37PM | Last Updated: May 11 2018 4:12PMमुंबई : प्रतिनिधी

राज्य पोलीस दलातील अस्थापना विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून मुंबईतील राहत्या घरामध्ये आत्महत्या केली. ते गेल्या अनेक महिन्यांपासून हाडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. या आजारपणाला कंटाळून आपण  जीवन संपवत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दक्षिण मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरातील सुरुची सुनीती इमारतीमध्ये ते कुटुंबासोबत राहात होते. कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेण्यासाठी ते 23 नोव्हेंबर 2016 पासून वैद्यकीय रजेवर गेले होते. शुक्रवारी पत्नीसोबत घरामध्ये एकटे असलेल्या रॉय यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. तोंडातून गोळी आरपार झाल्यामुळे, त्यांच्या चेहर्‍याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रॉय यांनी गोळी झाडून घेतल्याचे लक्षात येताच त्यांच्या पत्नीने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या गार्डना बोलावून घेत शासकीय वाहनातूनच त्यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल केले.  मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

डॉक्टारांनी उपचारांपूर्वीच रॉय यांना मृत घोषित केले. रॉय यांच्या चालकाने या घटनेची माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. रॉय यांच्या आत्महत्येची बातमी समजताच मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह मुंबई आणि राज्य पोलीस दलातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी पोहचलेल्या कफ परेड पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरू केला आहे. रॉय यांच्या घरातून महत्वाचे पुरावे, तसेच ज्या रिव्हॉल्वरमधून त्यांनी गोळी झाडून घेतली ते रिव्हॉल्वर ताब्यात घेत तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहे.

जिममधली भेट अखेरची ठरेल असे वाटले नव्हते- माजी गृहमंत्री जयंत पाटील

काल सकाळी हिमांशू रॉय जिममध्ये भेटले होते. त्यावेळी कॅन्सरबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. ’केमोथेरपीलासुद्धा काही मर्यादा असतात’ असे ते म्हणाले. पण ही भेट अखेरची ठरेल असे वाटले नव्हते, अशा भावना माजी गृहमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. जयंत पाटील म्हणाले, हिमांशू रॉय थोडेसे दुःखी वाटत होते. उपचारांमुळे किती वेदना होतात, हे ते सांगत होते.

त्यांचा चेहरा काळवंडला होता. डॉक्टर म्हणतात प्रोग्रेस चांगली आहे, पण ते गॅरेंटी देत नाहीत असंही ते सांगत होते.पण ते असं काही पाऊल उचलतील असे मात्र मला वाटले नाही.सात आठ महिन्यांपूर्वी जेव्हा बोललो होतो, तेव्हा ते पॉझिटिव्ह होते. आजाराशी लढा देईन असं ते बोलले होते, असा धाडसी आणि कणखर अधिकारी इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असे कधीही वाटले नाही. त्यांच्या निधनाने मुंबई पोलीस दलाने एक धडाडीचा अधिकारी गमावला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

वाचा : पोलिसातला बॉडी बिल्डर चटका लावून गेला

Tags : himanshu roy, ats, police,