Wed, Mar 27, 2019 06:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयआयटीयन्सच्या पसंतीक्रमात जपान, तैवानसह युरोपीय देश आघाडीवर

आयआयटीयन्सच्या पसंतीक्रमात जपान, तैवानसह युरोपीय देश आघाडीवर

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 1:53AM

बुकमार्क करा


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

आयआयटीत पदवी घेवून विदेशात स्थायिक होऊ पाहणार्‍यांचा  पसंतीक्रम आता बदलू लागला आहे. एकेकाळी अमेरिका हेच ध्येय बाळगणारे आता  जपान, तैवान, कॅनडा, सिंगापूर आणि युरोपातील काही देशांना पसंती देत आहेत. 

अमेरिकेच्या बदललेल्या व्हिसा धोरणांचा हा परिणाम आहे. 2016 सालच्या कँपस मुलाखतीत अमेरिकन कंपन्यांची करोडो रुपयांची ऑफर लेटर मिळालेले आयआयटीयन्स अजूनही अमेरिकेत नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अनेकांनी पसंतीचे देश बदलले आहेत.  यावर्षी आयआयटीयन्सना मिळणार्‍या अमेरिकन कंपन्यांच्या ऑफर्समध्ये घट झाली आहे. गेल्यावर्षी ऑफर लेटर मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच अमेरिकेत रुजू झाले आहेत. उरलेल्यांनी संबंधित कंपन्यांच्या भारतातील अथवा इतर देशांतील कार्यालयांत काम करण्यास सुरुवात केली आहे. 

मायक्रोसॉफ्टने निवडलेल्या काही विद्यार्थ्यांना कॅनडात संधी देऊ केली आहे. अर्थात अमेरिकेत मिळणारे वेतन आणि कॅनडात मिळणारे वेतन यात तफावत आहे. मात्र कंपनीचा इतिहास आणि अमेरिकेत रुजू करून घेण्याचे आश्‍वासन पाहता विद्याथ्यार्ंकडून ती संधी घेतली जात आहे. त्यासाठी  इतर देशात एक दोन वर्षे सेवा बजावण्याचीही या विद्यार्थ्यांची तयारी आहे. 

मुंबई आयआयटीत संगणक विज्ञान शिकणार्‍या एका विद्यार्थ्याच्या मतानुसार, विद्यार्थ्यांची पहिली पसंती अमेरिकेलाच असते. एक दोन वर्षे काम करून तिथे उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र केवळ व्हिसासाठीच एक वर्षाहून अधिक काळ लागत असेल तर विद्यार्थी दुसर्‍या देशाचा विचार करू शकतात. एचवन बी व्हिसापेक्षा विद्यार्थी व्हिसा मिळवणे अधिक सोपे आहे. 

आयआयटी मुंबईनेही यावर्षी कँपस मुलाखतीसाठी दाखल झालेल्या अमेरिकी कंपन्यांकडे व्हिसासंबंधी हमीची मागणी केली होती. यातील बहुतेक कंपन्या विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमात आघाडीवर होत्या. जपान, तैवान, सिंगापूर या देशातील कंपन्यांनीही आयआयटीयन्सच्या नियुक्‍तीत रस दाखवला होता.