होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चुका सुधारून कर्जमाफी : मुख्यमंत्री

चुका सुधारून कर्जमाफी : मुख्यमंत्री

Published On: Dec 14 2017 8:49PM | Last Updated: Dec 14 2017 8:48PM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

दिवाळीमध्येच कर्जमाफी देण्याच्या घाईगडबडीत कर्जमाफी योजनेत काही चुका झाल्या असल्या तरी या चुका सुधारून कर्जमाफी योजनेवर अंमलबजावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत 43 लाख 16 हजार खातेदार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे 20 हजार 734 कोटी रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत, असे सांगतानाच शेवटचा पात्र शेतकरी शिल्लक असेपर्यंत ही योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. मात्र, कर्जमाफीत होत असलेली दिरंगाई आणि बोंडअळीच्या नुकसानीबद्दल सरकार कोणतीही ठोस मदत देत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.

सत्ताधारी पक्षाच्या वतीने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर 293 अन्वये चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेत विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीस विलंब लागत असल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात 2008 मध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी 28 महिन्यांनंतर झाली. 

आपल्या सरकारने त्यापेक्षा गतीने योजना राबविली आहे. दिवाळीतच कर्जमाफी देण्यासाठी असलेल्या दबावापोटी सरकारकडून घाईगडबडीत काही चुका झाल्या असल्या तरी त्या दुरुस्त करून सरकार अंमलबजावणी करीत आहे. आघाडी सरकारने दिलेल्या कर्जमाफीत 39 टक्के अनियमितता आढळून आली. या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

43 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वर्ग करण्यात येणार असताना उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा केले जातील. मात्र, फॉर्म भरला नसला आणि कोणत्याही पात्र शेतकर्‍याने दावा केला तरी त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल, असे स्पष्ट करतानाच त्यांनी आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफी योजनेतील घोटाळ्यांवर बोट ठेवले.