होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नका

टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नका

Published On: Jan 12 2018 1:54AM | Last Updated: Jan 12 2018 1:04AM

बुकमार्क करा
मुंबई : चंद्रशेखर माताडे

पंचगंगा नदीच्या प्रदूषणप्रश्‍नी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य इमारतीचा वीजपुरवठा तोडल्यानंतरही याबाबत ढिलाई होत असेल तर  या खात्याचा मंत्री म्हणून जनतेच्या हितासाठी आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागेल; ती घेण्यास भाग पाडू नका, अशा शब्दात कदम यांनी  महापालिकेच्या यंत्रणेला फटकारले. 

महापालिकेची सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी अतिवृष्टीमुळे फुटली. त्यामुळे शहरासह गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यााबाबतची माहिती मिळताच पर्यावरण मंत्र्यांनी त्याची दखल घेतली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंत्रणेमार्फत त्याचा अहवाल  मागविला. महापालिका यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या  उपाययोजनांचीही माहिती घेतली.

मात्र हे प्रदूषण रोखण्यात महापालिका यंत्रणेकडून उशीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे येथे झालेल्या विभागाच्या बैठकीतच महापालिकेवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पर्यावरणमंत्र्यांच्या लेखी आदेशानंतरच कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य इमारतीचा वीजपुरवठा एक तासाच्या मुदतीसाठी तोडण्यात आला होता. 

गुरुवारी मंत्रालयातील   प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर मंत्री रामदास कदम यांनी महापालिका आयुक्तांना दूरध्वनी करून पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी नाराजी व्यक्त केली. याबाबत टोकाची कारवाई करण्यासही  आपण मागेपुढे पहाणार नाही, पण ती वेळ आपल्यावर आणू नका असे सांगितले.