Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभियांत्रिकी : जागा यंदाही रिक्त राहणार

अभियांत्रिकी : जागा यंदाही रिक्त राहणार

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:50AMमुंबई : प्रतिनिधी 

अभियांत्रिकी क्षेत्रातील करियरचा दबदबा आता दिवसेदिवस कमी होत असून गतवर्षी प्रमाणे यंदाही चित्र आहे. सुमारे 1 लाख 29 हजार जागांच्या समोर केवळ 1 लाख 6 हजार   अर्ज आले आहेत.  त्यामुळे यंदाही जागा कमी करुनही 30 हजार जागा रिक्‍त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

बारावीच्या निकालात राज्यातील नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता तसेच कुशल मनुष्यबळासाठी अनेक शासनाच्या योजना सुरु करुनही यावर्षीही अभियांत्रिकी प्रवेशाला अच्छे दिन आलेले नाहीत. यावर्षी चांगला प्रतिसाद मिळून जागा भरून निघतील असा अंदाज व्यक्‍त केला जात होता. यंदाच्या प्रवेशातही विद्यार्थ्यांनी कमी प्रतिसाद दिला आहे. सर्व शासकीय, स्वायत्त व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत उपलब्ध प्रवेशपात्र जागांच्या क्षमतेपेक्षा नोंदणी कमी झाली. त्यामुळे या वर्षीही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

1 लाख 6 हजार 200 अर्ज दाखल झाले आहेत. यामधील 1 लाख 4 हजार 804 विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टही गुरुवारी रात्री जाहीर झाली आहे. गतवर्षी 56 हजार जागा रिक्‍त राहिल्या होत्या. गेल्यावर्षी 1 लाख 38 हजार 226 जागा होत्या यंदा मात्र राज्यभरात 1 लाख 29 हजार 702 जागा असणार आहेत.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 8 हजार 500 जागा घटल्या आहेत. मागील वर्षी 1 लाख 38 हजार 226 जागांसाठी केवळ 81 हजार 736  विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेतले होते. तब्बल56 हजार 490 जागा रिकामी राहिल्या होत्या. रिकामी राहण्याचे प्रमाण 40.87 टक्के इतके प्रमाण होते. यंदाही तीच स्थिती राहणार आहे. गुरुवारी संकेतस्थळावर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.  या यादीवर आक्षेप नोंदविण्यास 22 व 23 जून अशी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 24 जूनला पक्की गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 25 ते 28 जून अखेर पसंती क्रम नोंदवण्याची मुदत आहे. 29 जूनला पहिली प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी लागेल.