Sat, Aug 17, 2019 16:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५० लाखांच्या जुन्या नोटांसह इंजिनीअरला अटक

५० लाखांच्या जुन्या नोटांसह इंजिनीअरला अटक

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 1:38AMमुंबई : प्रतिनिधी

सुमारे 50 लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह एका 45 वर्षांच्या सिव्हील इंजिनिअरला शनिवारी साकिनाका पेालिसांनी अटक केली. अस्लम मिर्झा बेग असे या इंजिनिअरचे नाव असून अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. फ्लॅट विक्रीतून त्याला ही रक्कम मिळाली होती, मात्र नोटबंदीनंतर त्याला त्या नोटा बदलता आले नाही असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

अस्लम मिर्झा हे सिव्हील इंजिनिअर म्हणून काम करतात. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील गावदेवी डोंगरी, बाबूभाई आयनेवली चाळीत राहतात. शनिवारी ते सुमारे 50 लाख रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन साकिनाका परिसरात आले होते. साकिनाका येथील मिठी नदीजवळील टर्मिनस रोड क्रमांक दोन, समिधा कॉम्प्लेक्स परिसरात त्यांना साकिनाका पोलिसांच्या गस्त घालणार्‍या एका विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना 50 लाख रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. या सर्व नोटा पाचशे रुपयांच्या होत्या. 

या सर्व नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी नंतर कारवाई करण्यात आली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्यांची पोलीस ठाण्यात जामिनावर सुटका करण्यात आली.