Tue, Oct 24, 2017 16:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना नोकरी

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना नोकरी

Published On: Sep 14 2017 2:26AM | Last Updated: Sep 14 2017 1:57AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे संबंधीत कुटुंबिय उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलाला सरकारी सेवेतील गट क च्या नोकरभरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरुवातीला परिवहन विभागापुरताच यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. पण शासनातील सर्वच विभागांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

रावते म्हणाले, पाऊस समाधानकारक पडत नसल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. शेती कसण्यासाठी घेतलेले कर्जही त्याला फेडता येत नसल्यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत.  शेतकरी हा व्यवस्थेचा बळी असून त्यांच्यानंतर कुटुंबियांचे आणि मुलाबाळांचे मोठे हाल होतात. शासन या कुटुंबियांना आर्थिक मदत देते. पण या कुटुंबाला खंबीरपणे उभे करण्याच्या दृष्टीने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी आपण केली होती.

सुरुवातीला परिवहन विभागाच्या गट क च्या भरतीसाठी आपण प्रस्ताव सादर केला होता. पण त्याचे महत्व लक्षात घेऊन शासनाच्या सर्वच विभागांसाठी हा निर्णय घेण्यात यावा, असे सुचविले होते. सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभाग यांच्या शिफारशीनंतर या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात येत असल्याचे रावते यांनी सांगितले.