Sat, Aug 24, 2019 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीला ऑनलाईन, मात्र बारावीला मोकळी वाट

अकरावीला ऑनलाईन, मात्र बारावीला मोकळी वाट

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 22 2019 1:22AM
मुंबई : प्रतिनिधी

अकरावीला गुणवत्तेनुसार ऑनलाइन प्रवेश होत असले तरी बारावीला मात्र हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभाग मोकळी वाट करुन देत आहे. अकरावीनंतर बारावीला जाताना हवे ते कनिष्ठ महाविद्यालय मिळवून प्रवेश घेण्यार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा फायदा काय असा सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे.

गेल्या दहा वर्षापासून मुंबई एमएमआर विभागात अकरावीचे ऑनलाइन प्रवेश सुरू आहेत. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेनुसारच अकरावीच्या वर्गात ऑनलाइन प्रवेश देण्यात येतो. दहावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे बारावीला गेल्यानंतर महाविद्यालय बदली करुन प्रवेश घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षापासून वाढत आहे. पालकही आपल्या पाल्याला बारावीला चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी डोनेशन देवून महाविद्यालय बदली करुन घेतात, याची तयारी अकरावीच्या परीक्षेच्या अगोदरच पालक करीत असतात. त्यामुळे अनेक पालक आता बारावीला चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी धडपड करताना दिसत आहेत. मात्र या पालकांना मोकळीक देण्याचे काम गेल्या तीन वर्षापासून शालेय शिक्षण विभाग करत आहे. 

तत्कालीन उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी बारावीचे प्रवेशही ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भात काहीच निर्णय न घेतल्याने तो बारगळला. गेल्या काही वर्षापासून अकरावीनंतर बारावीला महाविद्यालय बदलण्याचा सपाटा विद्यार्थी-पालकांनी सुरु केला आहे. याला अटकाव करण्याऐवजी शिक्षण उपसंचालक परिपत्रक काढून मोकळीक दिली जात आहे. अकरावीला प्रवेश ऑनलाइन होत असले तरी बारावीला ऑफलाइन प्रवेश देता येत असल्याने अनेक महाविद्यालयांकडूनही डोनेशन भरमसाट उकळले जाते, याला प्रतिबंध बसावा म्हणून आता बारावीच्या वर्गात रिक्त राहणार्‍या जागांचे प्रवेश ऑनलाइन आणि गुणवत्तेनुसारच करण्याच्या निर्णयाबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयांकडून काहीच हालचाली दिसत नाहीत या उलट बारावीच्या प्रवेशाचे दरवर्षी पत्रक काढून मोकळी वाट दिली जात असल्याची तक्रार पालकांची आहे.

ही कारणे दिल्यास बारावीला प्रवेश     

  •      सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे
  •      पालकांची बदली होणे
  •      वैद्यकीय कारणास्तव परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे
  •      शाखा बदलून मिळणे
  •      विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे
  •      बारावीमध्ये विद्यार्थ्यांचा बोर्ड 
  •     बदलण्याचा विचार असल्यास