Thu, Jun 27, 2019 02:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीची आता प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य फेरी?

अकरावीची आता प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य फेरी?

Published On: Aug 20 2018 1:49AM | Last Updated: Aug 20 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी

अकरावीच्या स्पेशल फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) हाच पर्याय राहणार आहे. शनिवारी जाहीर झालेल्या स्पेशल फेरीसाठी 47 हजार 576 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी 38 हजार 567 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे 9 हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना 21 ऑगस्टनंतर एफसीएफएस नुसारच प्रवेश घेता येणार आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत तब्बल 9 हजार विद्यार्थ्यांना अर्ज करूनही प्रवेश मिळू शकलेला नाही. यामधील पाच हजार असे विद्यार्थी आहेत, की ज्यांचे आतापर्यंत एकाही यादीत नाव जाहीर झालेले नाही. या प्रवेश फेरीत सहभागी होता न आलेले हजारो विद्यार्थी पुढील फेरीच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी दुसरी स्पेशल फेरी घ्यावी  अशी आहे. मात्र राज्यभरातील अकरावीचे प्रवेश अंतिम टप्प्यात असल्यामुळे या विद्यार्थ्यांना एफसीएफएस शिवाय आता पर्यायच नाही, असे शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 

यंदा ही प्रक्रिया 15 ते 20 दिवस लांबणीवर गेल्यामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही कोलमडले आहे. ज्या महाविद्यालयांचे 70 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत, त्या महाविद्यालयांचे वर्ग सुरू झाले आहेत. कमी गुण असणारे विद्यार्थी मात्र प्रवेशासाठी अजूनही हेलपाटे घालत आहेत. 

कमी गुण असणार्‍या विद्यार्थ्यांना कोणते महाविद्यालय निवडावे याचे नीट मार्गदर्शन शाळांकडून आणि शालेय शिक्षण विभागाकडून दिले नसल्याने या विद्यार्थ्यांचा गोंधळ अधिक असल्याचे दिसून येत आहे.  विद्यार्थी कमी गुण असतानाही चांगल्या महाविद्यालयाची अपेक्षा करत असल्याने अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश मोठ्या संख्येने लटकले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या अगोदरच विद्यार्थ्यांना मिळालेली टक्केवारी आणि विद्यार्थी देत असलेला महाविद्यालय पसंतीक्रम याचा ताळमेळ कसा घालावा यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शन शालेय शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी शाळा स्तरावर द्यावे तसेच पालकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याची मागणीही पुढे येत आहे. पालकांना तसेच विद्यार्थ्यांना अर्धवट माहिती असल्याने दरवर्षी अनेक विद्यार्थी शिल्‍लक राहतात माग त्यांना एफसीएफएस फेरीचा आधार घ्यावा लागत आहे.

सुमारे 40 हजारहून अधिक विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार प्रवेश समितीने विशेष प्रवेश फेरीचे आयोजन केले. मात्र या फेरीतही परिस्थितीत फारसा बदल घडला नाही. अल्पसंख्याक कोटा, संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा यातील रिक्त जागा जमा झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 70 ते 80च्या दरम्यान होती त्या बहुतांश विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळाले आहेत. पहिल्या  पसंतीचे महाविद्यालयही 18 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाले आहे.