Fri, Nov 16, 2018 21:54



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचे उद्या होणार लोकार्पण 

घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचे उद्या होणार लोकार्पण 

Published On: Feb 21 2018 7:05PM | Last Updated: Feb 21 2018 7:05PM



नवी मुंबई : राजेंद्र पाटील 

महावितरणच्या वतीने देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा उद्या गुरुवार, सायं. ६ वाजता घारापुरी बेटावर (शेतबंदर) येथे होणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री  जयकुमार रावल, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री  रवींद्र चव्हाण, ऊर्जा व पर्यटनचे राज्यमंत्री  मदन येरावार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

या प्रकल्पात २२ केव्ही, सिंगल कोअर केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून ७.५ किमी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. या सबमरीन केबल मार्फत देण्यात आलेला हा वीज पुरवठा पनवेल विभागातील टी.एस.रेहमान या उपकेंद्रातून दिला गेला आहे. तसेच घारापुरी बेटावर विद्युत पुरवठा देण्यासाठी ७.५ किमी.ची २२ केव्ही उच्चदाब वीज वाहिनी टाकण्यात आलेली आहे. तर शेतबंदर, मोराबंदर व राजबंदर या तीन वाड्यांवर प्रत्येकी एक ट्रान्सफॉरमर (रोहित्र) बसवण्यात आले आहेत. सध्या १६४ हून अधिक कुटुंबांनी आणि व्यावसायिकांनी या बेटावर वीज जोडणी घेतली आहे.

७० वर्षानंतर प्रथमच या बेटावर वीज पोहोचली असून याकामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने कामास गती मिळाली. घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाकरता केंद्र व राज्य शासनाची परवानगी मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामास फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरवात झाली. या प्रकल्पाच्या कामात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष दिले. तर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.