Wed, Jul 17, 2019 08:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील सर्व शेतीपंपांना वीजजोडण्या

राज्यातील सर्व शेतीपंपांना वीजजोडण्या

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 12:42AMमुंबई : प्रतिनिधी

कोल्हापूर सांगली सातार्‍यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातील पेड पेंडींग असलेल्या शेती पंपाना येत्या ऑक्टोबर 2019 पर्यंत वीज जोडण्या देण्यात येणार असल्याची घोषणा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. मात्र या जोडण्या देताना मराठवाडा व विदर्भाला बजेटमधुन तरतूद करण्यात आली तर पश्‍चिम महाराष्ट्रासाठी अशी तरतूद का नाही अशी विचारणा करत शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सदस्यांनी वेलमध्ये उतरून घोषणा दिल्या. 

सत्यजित पाटील यांनी ही लक्षवेधी मांडली. 2014 साली वीज जोडणीसाठी 20 हजारावर शेतकर्‍यांनी पैसे भरूनही पंपाला वीज मिळत नाही. विदर्भ मराठवाड्यातील पंपाना जोडणी देण्यासाठी 750 कोटी रूपये बजेटमध्ये राखुन ठेवण्यात आले. मग पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवरच अन्याय का? असा सवाल केला. दिलीप वळसे पाटील यांनी मंत्री दिशाभूल करत असल्याचे सांगितले. 
चंद्रदीप नरके यांनी कोल्हापुरात वीज जोडण्या तातडीने देण्याचे आश्‍वासन मंत्र्यांनी देऊनही ते पाळले नसल्याचे सांगितले. 

अनिल बाबर यांनी बजेटमधुन पश्‍चिम महाराष्ट्रातील पंपाना वीज जोडणी देण्याची मागणी केली. शशिकांत शिंदे यानीही कोल्हापूर, सांगली व सातार्‍यावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. जयंत पाटील यांनी मंत्री भविष्यात काय घडणार याचा दाखला देत जोडणी देणार असल्याचे सांगत आहेत हे योग्य नसल्याचे सांगितले. चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हांस पाटील,प्रकाश अबिटकर यांनी वेलमध्ये   उतरून पश्‍चिम महाराष्ट्रावरील अन्याय दूर झालाच पाहीजे अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. 

या सर्व चर्चेला  उत्तर देताना  मंत्री बावनकुळे यांनी कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह राज्यातील सर्व पेड पेंडींगला जोडणी देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. वीज कंपनी 2 हजार कोटी रूपयांचे कर्ज काढून 15 ऑगस्ट पासुन विशेप कार्यक्रम हाती घेणार आहे. विदर्भ व मराठवाड्यातील जोडण्या देण्याचा कार्यकमही याचवेळी सुरू होणार असुन ऑक्टोबर 2019 पर्यंत या सर्व पेड पेंडींग पंपाना वीज जोडण्या देणार असल्याचे स्पष्ट केले.    

पाणीयोजनांचे बिल सरकार भरणार : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी

 गेल्या तीन वर्षापासुन शेती पंपांची वीज बिलांची वसुली करण्यात आलेली नाही.  17 हजार कोटी रूपयांची ही थकबाकी असुन ती वसुल करण्याचे आदेश वीज नियामक आयोगाने दिले आहेत.तरीही थकीत वीज बिलापोटी कोणाचीही वीज तोडली जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीे विधानसभेत केली. 

अजित पवार यांनी हा प्रश्‍न  उपस्थीत केला. राज्यात  शेती पंपाची वीज तोडण्याचा धडक कार्यक्रम सुरू असल्याचे सांगुन ते म्हणाले की, जोडणी नाही पण तोडणी सुरू आहे. ज्यानी बील भरले नाही त्यांची वीज तोडली पण ज्यांनी बिल भरले आहे त्यांचीही वीज तोडली जात आहे. 

एवढेच नव्हे तर ज्या शेतकर्‍यांने 2014 साली वीज पंपासाठी अर्ज करून पैसे भरले त्याला अद्याप वीज जोडणी दिली नाही मात्र त्याला 24 हजार रूपयांचे बिल पाठविण्यात आल्याचे पवार म्हणाले. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही जोडणी तोडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत त्यांचे बिल सरकारकडून भरले जाणार असल्याचेही सांगितले. 

Tags : Mumbai, Mumbai news, Electricity, connection, agricultural pump,