Tue, Jan 22, 2019 20:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोल -डिझेलप्रमाणे विजेचाही झटका!

पेट्रोल -डिझेलप्रमाणे विजेचाही झटका!

Published On: May 24 2018 1:51AM | Last Updated: May 24 2018 1:41AMकोलकाता : वृत्तसंस्था

देशातील औष्णिक उर्जेची वाढती मागणी आणि त्या तुलनेत कोळशाच्या पुरवठ्यात जाणवणारा तुटवडा यामुळे विजेचा प्रतियुनिट दर 6.20 रुपयांवर पोहोचला आहे. हा दोन वर्षातील सर्वात उच्चांकी दर आहे. काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर अनेक राज्यांतील नागरिकांना विजेसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 2016 मध्ये विजेचा प्रतियुनिट दर 6 रुपयांवर पोहोचला होता.

गेल्याच आठवड्यात विजेचा दर 4 रुपये प्रतियुनिट इतका होता. मात्र वाढत्या उकाड्याने विजेच्या मागणीत झालेली वाढ तसेच या तुलनेत पुरेशा प्रमाणात कोळशाचा पुरवठा न झाल्याने एका आठवड्यातच दरात प्रतियुनिटमागे 2 रुपयांची वाढ झाली आहे. पश्‍चिम भारतातून उत्तर भारतात वीज पुरवठा करणारी ट्रान्समिशन लाईन बंद झाल्याने तसेच उत्तरेतील राज्यांतून विजेची मागणी वाढल्याने सोमवारी अनेक राज्यांत विजेचा दर 8 रुपये प्रतियुनिटवर पोहोचला होता. हाच दर सध्या 7.43 रुपये इतका आहे.

अर्थात ही परिस्थिती जास्त काळ अशीच राहणार नसल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. स्पॉट मार्केटमधून वीज खरेदी करणार्‍या गुजरात, महाराष्ट्र, बिहार, पश्‍चिम बंगाल, आंध्र व तामिळनाडू यांच्या वीज वितरण कंपन्यांना पुरवठ्यासाठी कमी वीज मिळत आहे. जर त्यांना जादा पैसे मोजून वीज खरेदी करावी लागत असेल तर त्याचा बोजा निश्‍चितपणे औद्योगिक व घरगुती ग्राहकांवर पडणार आहे.