राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जूनला मतदान

Last Updated: Jun 01 2020 7:36PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी याबाबतची माहिती देण्यात आली. गेल्या २६ मार्च रोजीच या निवडणुका होणार होत्या. तथापि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना विषाणूचे संक्रमण झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी राज्यसभेच्या २६ मार्चला होणा-या निवडणुका पुढे ढकलण्याचा सल्ला आयोगाला दिला होता. आयोगाने त्यानुसार ही निवडणूक पुढे ढकलली होती. राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी निवडणुका होणार होत्या आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १८ मार्च ही होती. ३७ जागांसाठी केवळ एक अर्ज आल्याने उर्वरित १८ जागांसाठी आयोगाने २६ मार्च रोजी मतदान घेण्याचे निश्चित केले होते. तथापि, हा निर्णय पुढे ढकलला गेला होता.

ज्या १८ जागांसाठी मतदान होणार आहे, त्यात गुजरात आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी चार जागा असून राजस्थान आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी तीन, झारखंडमधील दोन तर मणिपूर आणि मेघालमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.