Thu, Nov 22, 2018 00:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवडणूक कामे नाकारणार्‍या ४८ शिक्षकांवर गुन्हे

निवडणूक कामे नाकारणार्‍या ४८ शिक्षकांवर गुन्हे

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:11AM

बुकमार्क करा

कल्याण : वार्ताहर

निवडणुकीची कामे करण्यास नकार देणार्‍या कल्याणमधील 48 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या निर्णयाबाबत शिक्षक संघटनेने नाराजी व्यक्त केली असून निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे सांगितले.

निवडणूक आयोगाच्या 23 ऑक्टोबर 2017 च्या परिपत्रकानुसार 5 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी करणे बंधनकारक होते. या प्रक्रियेनुसार बीएलओची जबाबदारी पार न पाडणार्‍या व्यक्तींविरोधात नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आदेशित केलेले आहे. त्यानुसार केडीएमसी क्षेत्रातील ब आणि क प्रभागातील खासगी शाळांमधील शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कालावधीत संबंधित कामकाज न केल्याने 48 शिक्षकांवर येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क आणि ब  प्रभागक्षेत्र अधिकारी तथा अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विनय कुलकर्णी आणि भागाजी भांगरे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याविरोधात शिक्षकांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.