Mon, Aug 19, 2019 01:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कोरेगाव भीमा’ हे मोठे षडयंत्र : मुख्यमंत्री

‘कोरेगाव भीमा’ हे मोठे षडयंत्र : मुख्यमंत्री

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 2:00AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी 26 जानेवारी रोजी ‘संविधान बचाव रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला असताना, त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय प्रदेश भाजपने घेतला आहे. कोणी जर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशावेळी भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा झेंड्याखाली सर्वांना सोबत आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेशही त्यांनी दिले. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी दादर येथे पार पडली. या बैठकीत भीमा कोरेगावमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतर राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याबाबत होत असलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्‍त केली. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. भविष्यातही राज्यात जातीय सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. भीमा कोरेगावप्रकरणी मोठ्या प्रमाणावर षड्यंत्र झालेले आहे. मात्र, सरकारने या प्रकरणात आपली जबाबदारी नीटपणे पार पाडली. राज्य सरकार चांगले काम करीत असताना आणि राज्याचा होत असलेला विकास पाहून विरोधक हवालदिल झाले असून, ते भाजप व सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी असा उद्योग करीत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी सावध व्हावे. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून जातीय सलोखा कायम राहील याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

बदनाम करण्याचा कट

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, सध्या केंद्र आणि राज्यातील सरकारची विकासकामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून ‘संविधान बचाव रॅली’ काढण्यात येत आहे. मात्र, विरोधकांच्या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून प्रत्येक जिल्ह्यात ‘तिरंगा रॅली’ काढण्यात येईल. 

विकासकामांवर चर्चा 

यापूर्वी सरकारविरोधात विरोधकांकडून काढण्यात आलेला हल्लाबोल मोर्चा अपयशी ठरला. त्याचा कोणताही परिणाम राज्यातील जनतेवर झाला नाही. आता पुन्हा काढण्यात येत असलेल्या हल्लाबोलचाही कोणताही परिणाम होणार नसल्याचे दानवे म्हणाले. भीमा कोरेगाव येथील प्रकरणानंतर काहीजणांकडून समाजात तेढ माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांना सौहार्दाचे वातावरण राखण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. यावेळी राज्यातील सामाजिक, राजकीय वातावरण आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या विकासकामांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचेही दानवे यांनी सांगितले.