Mon, May 20, 2019 11:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीधर, शिक्षक मतदारसंघात प्रचंड चुरस 

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात प्रचंड चुरस 

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:32AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

विधानपरिषदेच्या मुंबई  आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर कोकण पदवीधर मतदारसंघात 14 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातही उमेदवारांची संख्या दोन आकडी असल्याने तेथेही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. 

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी 25 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. मुंबई तसेच कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना आणि भाजप या दोन पक्षातच प्रमुख लढत आहे. मुंबईतून शिवसेनेने सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे तिकीट कापून विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने अ‍ॅड. अमितकुमार मेहता यांना उमेदवारी दिली आहे. शेकापचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांना दोन्ही काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये उडी मारली. त्यांना भाजपने उमेदवारी दिली असून शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे महापालिकेचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात खरी लढत ही तीन ठाणेकरांमध्येच आहे. संजय मोरे निवडणुकीत उतरल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) यांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणाला लागली आहे.  

मुंबई शिक्षक मतदारसंघात 10 उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले आहेत. लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. नाशिक  शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात 16 उमेदवार असून त्यामध्ये भाजपचे अनिकेत विजय पाटील, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे आणि संदीप बेडसे यांच्यात चुरस आहे. कोकण पदवीधर मतदार संघात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने भाजपच्या निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

निकालाची उत्सुकता 

विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी 12 जूनला होणार आहे. या मतदासंघात 21 मे रोजी मतदान झाले. मात्र, निवडणुकीचा वाद न्यायालयात गेल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीला स्थगिती दिली होती. आता न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात सामना रंगला होता. मात्र, या निवडणुकीत ग्रमविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.