Wed, Feb 19, 2020 10:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात

ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 1:46AM

बुकमार्क करा

ठाणे : खास प्रतिनिधी

ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने संघटनात्मक ताकदीच्या बळावर सत्तेपर्यंत मजल मारली. मात्र स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अखेर भाजप पुरस्कृत एका सदस्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेने बहुमताचा 27 हा जादूई आकडा पूर्ण केला आणि जिल्हा परिषदेवरील भगवा झेंडा फडकण्याचा मार्ग मोकळा केला. या पराभवातून भाजपमधील अंतर्गत वाद सुरू झाल्याचे बोलले जाते. 

ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 सदस्यांपैकी 26 जागा जिंकून शिवसेनेने बाजी मारली. भाजपाला 14 , राष्ट्रवादी 10 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि अपक्षाला प्रत्येक एक जागा मिळाली. एका गटात फेरमतदान होणार आहे.

बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी सेनेला एक सदस्य कमी पडला. ती कसर त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य अशोक घरत यांना शिवसेनेत प्रवेश देऊन भरून काढली. त्यामुळे सेनेला अन्य कुणाच्याही कुबड्यांची गरज भासणार नाही. असे असले तरी शिवसेनेने निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोबत घेतले असल्याने सत्तेत त्यांनाही वाटा मिळेल. त्यामुळे शिवसेनेकडे 52 पैकी 37 सदस्यांचे संख्याबळ असेल.

शिवसेना-राष्ट्रवादी तसेच काही ठिकाणी काँग्रेस ही युती भाजपला रोखण्यासाठी झाली होती. भाजपचे खा. कपिल पाटील यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्रित आले आणि पाटील यांचा पाडाव केला. पाटील यांना स्वगृहीत फटका बसला. त्यांना मतदारांनी नाकारले. श्रमजीवी संघटनेला ऐन निवडणुकीच्या वेळी सोबत घेतली नसती तर भिवंडीतही भाजपाचे पानिपत झाले असते. भाजपच्या 14 सदस्यांपैकी एक सदस्य हा श्रमजीवी संघटनेचा आहे. या निवडणुकीत भाजपने श्रमजीवी संघटनेच्या उमेदवारांना मदत केली नसल्याचा सूर त्यांच्या पदाधिकार्‍यांमधून उमटत आहे. त्याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बसू शकतो. खासदारांविरोधातील वाढणारे नाराजीचे सूर हे भाजपामधूनही वाढू लागले आहे. त्याचा परिपाक म्हणजे झेडपीमधील भाजपची सुमार कामगिरी होय, अशी जोरदार चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.