Wed, Apr 24, 2019 16:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसीत युतीच्या बिघाडीवर पडदा

केडीएमसीत युतीच्या बिघाडीवर पडदा

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:34AMकल्याण : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 9 मे रोजी होणार आहे. या दोन्ही पदांसाठी शनिवारी नामांकन अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. सेनेकडून महापौर पदासाठी विनिता राणे तर भाजपकडून उपमहापौरपदासाठी उपेक्षा भोईर यांनी नामांकन अर्ज पालिका सचिवांकडे सादर केला. 

सेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक कासिब ताणकी यांनीही उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केल्याने युतीतील वातावरण तंग झाले. त्यामुळे सुरुवातीला केवळ उपमहापौरपदासाठी नामांकन अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या भोईर यांनी लागलीच महापौरपदासाठीही अर्ज सादर केल्याने युतीत बेबनाव उघड झाला. मात्र, सेना-भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून या बिघाडीवर पडदा टाकून महापौरपदासाठी सेनेच्या विनिता राणे, उपमहापौरपदासाठी भाजपच्या उपेक्षा भोईर यांच्या नावाची घोषणा केली. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 13 व्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या बुधवारी, 9 मे रोजी होणार आहे. या दोन्ही पदांसाठी नामांकन अर्ज सादर करण्याचा शनिवारी अखेरचा दिवस होता. महापौरपदाचे नामांकन अर्ज भरण्यावरून सेना-भाजपमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत एकमत होत नसल्याने चांगलीच रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेच्या वतीने महापौर पदासाठी डोंबिवलीच्या विनिता राणे यांनी तर भाजपाकडून उपमहापौर पदासाठी उपेक्षा भोईर यांचा नामांकन अर्ज पालिका सचिवांकडे सादर केले.

मात्र, यानंतर शिवसेना समर्थक अपक्ष नगरसेवक कासिब ताणकी यांना शिवसेना व भाजपाच्या काही नगरसेवकांनी फूस लावून उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज सादर करण्यास भाग पाडले. यामुळे सेना-भाजपा युतीत बिघाडी झाली व भाजपाच्या उपेक्षा भोईर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरला असताना महापौर पदासाठीही आपला नामांकन अर्ज सादर केला. यामुळे काही काळ पालिकेतील वातावरण तंग होऊन सेना-भाजपाची युती तुटण्याच्या उंबरठ्यावर आली होती. अखेरीस शिवसेनेचे ठाणे जिल्ह्या प्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना गटनेता रमेश जाधव यांनी भाजपा गटनेते वरुण पाटील, उपमहापौर मोरेश्वर भोईर व भाजपाच्या अन्य पदाधिकार्‍यांची समजूत काढली. 

अखेरीस दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन सेना-भाजपा युतीतील बिघाडावर पडदा टाकत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक एकत्रित लढवत असून महापौरपदासाठी सेनेच्या विनिता राणे तर उपमहापौर पदासाठी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांची घोषणा केली. दरम्यान, अपक्ष नगरसेवक कासिब ताणकी यांनी उपमहापौर पदासाठी भरलेल्या नामांकन अर्जाला शकीला खान यांनी अनुमोदन दिले. तर सूचक शाहीन जव्वाद डोन असल्याने, कासीब ताणकि यांना शिवसेनेचे समर्थन नसल्याचे जाहीर करीत सेना-भाजपा युतीचे महापौर व उपमहापौर बसतील, अशी माहिती युतीच्या वतीने पत्रकारांना दिली. 

Tags : Mumbai, mumbai news, Mayor-Deputy Mayor post,  Election, Kalyan-Dombivali Municipal Corporation,