Mon, Jan 21, 2019 05:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; महिला केअरटेकरकडून वयोवृद्ध जोडप्याची हत्या

धक्कादायक; महिला केअरटेकरकडून वयोवृद्ध जोडप्याची हत्या

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 22 2018 2:42AMमुंबई : प्रतिनिधी

तीन आठवड्यांपूर्वी कामावर रुजू झालेल्या एका महिला केअरटेकरने वयोवृद्ध जोडप्याची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना खार परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मख्खी गोपाळदास जानी (85) आणि दया मख्खी जानी (80) अशी मृतांची नावे आहे. हत्येमागे चोरीचा उद्देश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येनंतर केअरटेकरने कपाटातील लाखो रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि रक्‍कम घेऊन पळ काढला. 

धक्‍कादायक म्हणजे, जानी राहत असलेल्या उच्चभू सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तसेच काम करणार्‍या सुरेखा नावाच्या केअरटेकर महिलेचा साधा फोटो अथवा कुठलीही माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आली नव्हती. 

मख्खी जानी हे त्यांची पत्नी दयासोबत खार येथील 21 वा रोड, एकता इलाईट अपार्टमेंटमध्ये फ्लॅट क्रमांक 101 मध्ये राहत होते. त्यांच्याकडे चार नोकर कामाला होते. त्यातील चालक, घरातील काम करणारा तरुण आणि जेवण बनविणारी एक महिला खारदांडा परिसरात राहतात. तर सुरेखा ही जानी यांच्यासोबत तिथे राहत होती. सुरेखा ही तीन आठवड्यांपूर्वीच कामावर रुजू झाली होती. जानी यांना दोन मुले आहे, त्यातील संदीप हा अमेरिका तर राजन हा सिंगापूरला राहतात. गुरुवारी सकाळी 9 वा. नेहमीप्रमाणे त्यांची जेवण बनविणारी महिला तिथे आली होती, तिने फ्लॅटची बेल वाजविली, मात्र आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने सुरक्षारक्षकालाही माहिती दिली. 

त्यानंतर इंटरकॉमसह जानी यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीच फोन घेतला नाही. त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांनी शिडीद्वारे तिला फ्लॅटमध्ये जाण्यास सांगितले. ही महिला बेडरुममध्ये गेली असता तिला मख्खी आणि दया हे दोघेही मृतावस्थेत आढळून आले.