Wed, Jul 24, 2019 12:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयासमोर वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:59AMमुंबई : प्रतिनिधी

मंत्रालय आणि मंत्रालयाच्या बाहेर आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी संध्याकाळी सखूबाई झालटे नावाच्या 65 वर्षीय महिलेने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलीस व पत्रकारांनी तात्काळ या वृद्ध महिलेला रुग्णालयात हलविल्याने पुढील प्रसंग टळला. 

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू या गावच्या रहिवासी असणार्‍या सखूबाई झालटे यांच्या मालकीची जमीन काही व्यक्तींनी हडपल्याची त्यांची तक्रार आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणी दाद मागितल्यावर देखील न्याय मिळत नसल्याने शुक्रवारी संध्याकाळी साडेचार-पाचच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील फूटपाथवर सोबत आणलेल्या बाटलीतील द्रव्य प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. 

मंत्रालयासमोर विधान भवनाकडे जाणार्‍या फूटपाथवर ही महिला बाटलीतून काहीतरी पित असल्याचे दिसताच पोलिसांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत ही महिला खाली कोसळली. त्या ठिकाणाहून पत्रकार परिषदेला जाणार्‍या पत्रकारांनी तात्काळ या महिलेला टॅक्सीत बसवून उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन महिलेची विचारपूस करत, न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.