Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणेशोत्वापूर्वी खड्डे बुजवण्याचे एकनाथ शिंदेचे आदेश

गणेशोत्वापूर्वी खड्डे बुजवण्याचे एकनाथ शिंदेचे आदेश

Published On: Sep 07 2018 7:05PM | Last Updated: Sep 07 2018 7:05PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांमधील पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्यात आले पाहिजेत तसेच उत्सवाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घेण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वाहतूक कोंडी, खड्डे हे सध्याचे संवेदनशील विषय असून यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये असे ते म्हणाले. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले.  

गणेशोत्सवापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कायदा सुव्यवस्थाविषयक बैठकीत ते बोलत होते. यावेळी या बैठकीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, तसेच कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके, भिवंडी निजामपूर महानगरपलिका आयुक्त मनोहर हिरे, मीरा भाईंदर पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, आदींची उपस्थिती होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्हात सुरू असलेल्या कामाची माहिती करून दिली.

पालकमंत्री शिंदे म्हणाले की, गणेशोत्सव, मोहरम हे सण एकाच कालावधीत येत असून पोलिस तसेच इतर यंत्रणांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी, हे दोन्ही सण नेहमी शांततेत व एकोप्याने पार पडले आहेत, तसे याही वर्षी व्हावे. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सणांच्या काळात वीज खंडित होणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी तसेच रेल्वे, एसटी सेवा सुरळीत सुरु राहावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

भिवंडी

विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे व डांबरीकरण काम वेगाने सुरु आहे. भिंवडी येथे १० विसर्जन घाट असून याठिकाणी पुरेशी व्यवस्था केली आहे. कल्याण रस्त्यावरील रेंगाळलेले रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी एमएमआरडीएने सबंधित कंत्राटदाराकडून ते लगेच करून घ्यावे तसेच राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम १२ ते १५ दिवसांत पूर्ण होईल, व्हीजेटीआयच्या मार्गदर्शनाने आणि देखरेखीखाली हे काम सुरु आहे असे मनोहर हिरे यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली

प्रत्येक प्रभागात एक खिडकी पद्धतीने गणेश मंडळांना परवानगी दिली असून २१६ मंडळाना परवानगी दिल्या आहेत . ६८ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. उल्हासनगर भागातील काही मोठे गणपती कल्याण येथे विसर्जनासाठी येतात त्यामुळे थोडी समस्या उद्भवते असे गोविंद बोडके म्हणाले.

उल्हासनगर

उल्हासनगर येथे ६० टक्के रस्ते सिमेंटचे आहेत त्यामुळे तितकीशी खड्ड्यांची समस्या नाही पण जिथे खड्डे आहेत ते डांबराने बुजवित आहोत. आत्तापर्यंत ऑनलाईन रीतीने ५४५ अर्ज आले असून १९२ मंडळांना परवानगी दिली आहे. ११ सप्टेंबर ला पोलीस आयुक्त उल्हासनगरात मंडळांची बैठक घेत आहेत

नवी मुंबई

२०२ मंडळांना परवानगी दिली आहे. २३ विसर्जन तलाव आहेत. ६७० स्वयंसेवक याठिकाणी तैनात करण्यात येतील, पुढील ४ ते ५ दिवसांत सर्व खड्डे बुजविण्यात येतील असे नवी मुंबई पालिका उपायुक्त रवींद्र पाटील म्हणाले.

मीरा भाईंदर

येथे २१ विसर्जन तलाव असून १ मोठा कृत्रिम तलावही आहे. ७० जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत, ३५ बोटी भाड्याने घेण्यात आल्या आहेत. २५ लाकडी तराफे तय्यार ठेवण्यात आले आहेत. ५ रुग्णवाहिका देखील असतील असे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितले.

ठाणे

ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून अहोरात्र प्रयत्न केले व रस्त्यांवरील खड्डे मोठ्या प्रमाणात बिजाविले आहेत. ३६ विसर्जन तलाव असून ऑनलाईन ३०९ अर्ज आले आहेत

३ हजार ५०० पोलीस कर्मचारी

पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले की, पाचही परिमंडळात पोलिसांची तयारी पूर्ण झाली असून १०८० सार्वजनिक गणेश प्रतिष्ठापना तर १ लाख ५० हजार घरगुती आणि २० हजार गौरींची प्रतिष्ठापना करण्यात येते. या गणेशोत्सवासाठी ३ हजार पाचशे पोलीस तैनात असतील. पोलीस उपायुक्त वाहतूक अमित काळे यांनी देखील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले. ग्रामीण पोलीस हद्दीत १०४० सार्वजनिक आणि ४० हजारापेक्षा जास्त खासगी गणपती बसविण्यात येतात अशी माहितीही यावेळी देण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने देखील आपापल्या तयारीची माहिती यावेळी दिली.

एस टी च्या ८०० बसेस

कोकणात व इतर ठिकाणी गणेशोत्सवासाठी ८०० बसेसचे आरक्षण पूर्ण झाले असून 450 बसेस गटांनी आरक्षित केलेल्या आहेत अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. एवढ्या बसेस ठाणे शहरातून वाहतूक करण्यास त्रासदायक होत असल्याने कॅडबरी जंक्शन तीन हात नाका असे सर्व्हिस मार्गावर या बसेस पार्क करण्यास दोन दिवसांसाठी परवानगी देण्याची विनंती त्यांनी केली.  नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले.