होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाल वादळाला भगवा सलाम!

लाल वादळाला भगवा सलाम!

Published On: Mar 12 2018 1:35AM | Last Updated: Mar 12 2018 1:35AMठाणे : प्रविण सोनवणे

ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारपासूनच मोर्चाच्या व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.शहापूरपासूनच मोर्चेकर्‍यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था शिवसेना करीत आहे. आनंदनगर चेकनाका येथील यार्डमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष दिले. पाण्याच्या व्यवस्थेपासून, त्यांना शिधा पोहोचवणे, मोबाईल टॉयलेट आणि अगदी अंघोळीला देखील पाणी कमी पडू नये यासाठी पाण्याचे टँकर मागवण्यात आले होते. वैद्यकीय सेवा देखील या ठिकाणी उत्तमरित्या करण्यात आली होती. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच रुग्णवाहिका या ठिकाणी सज्ज  ठेवण्यात आल्या होत्या.

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोर्चेकर्‍यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला. झेंड्याचा रंग वेगळा असला, तरी वेदना एकच असल्याचे ते म्हणाले. मोर्चा येताच शिवसेनेबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला. शिवसेना आणि मनसेपाठोपाठ राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काहीकाळ मोर्चेकर्‍यांसोबत चालून आपला सक्रिय पाठिंबा व्यक्‍त केला. शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असून सामूहिक कार्यक्रम ठरल्यावर त्यांच्या पाठीशी सातत्याने राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे मोर्चापुढे जाऊन समर्थन देतील, असे पवार म्हणाले.

काँग्रेसनेही या लाँग मार्चला पाठिंबा जाहीर केला असून सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकर्‍यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून केले आहे.

यावेळी पहिल्यांदाच शेतकरी पायी मुंबईत धडकणार असून यावेळी मागण्या मान्य होतील अशी आशा शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी शेतकर्‍यांचा लढा सुरू आहे. यापूर्वी अनेक आंदोलने देखील झाली, मात्र यावेळी कम्युनिस्टच्या झेंड्याखाली पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला असून मागण्या मान्य होतील अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. 
लाँग मार्चच्या सेवेत महापालिका

महापालिकेचे उप प्रमुख जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी मोर्च्याच्या सेवेत पालिकेने अनेक सुविधा सादर केल्या आहेत. मोर्चेकर्‍यांना डासांचा त्रास होऊ नये म्हणून धूर फवारणी करण्यात आली. महापालिकेच्या विविध रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले. 12 हजार लिटर क्षमतेचे तीन टँकर सोमय्या मैदानावर पाठवण्यात आले आहेत. 120 आसने असलेली फिरती शौचालये देण्यात आली असून खासगी कंत्राटदारांकडून देखील 20 अतिरिक्त शौचालये घेण्यात आहेत. सोमवारी हा मोर्चा आझाद मैदानावर जाणार असल्याने तेथेही 40 आसनी शौचालये पूरवण्यात येत आहेत. पिण्याचे पाणी चार टँकर तेथे तैनात करण्यात आले आहेत. मंत्रालय व आझाद मैदानाजवळील सर्व सार्वजनिक शौचालयांना दोन दिवस विनामुल्य सेवा देण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.

थकलेले, सुजलेले अनवाणी पाय अखेर मुंबईत विसावले

कोरडवाहू जमीन असल्यानं आमच्या गावात नागल्या,भुईमूग अशीच पिके आम्हाला घेता येतात. पाणीच नाही, मग शेती कशी करायची? पाऊस पडतो, पण धरून ठेवणारी जमीन नाही. त्यात दुष्काळ, नापिकी अशा अनेक समस्यांना तोंड देत गेली अनेक वर्षे आम्ही जगतो आहोत. आमच्या मुलाबाळांना तरी निदान त्यांचे हक्क मिळावेत या आशेने आम्ही इथवर झगडत आलो आहोत, अशी व्यथा देहेलगाव नाशिक इथून आलेल्या मीराबाई रामचंद्र मुंडेकर यांनी मांडली. 

मीराबाईंसारख्या अनेक महिला आणि पुरुष वनजमिनी हक्क कायदा, कर्जमाफी, पेन्शन, स्वामिनाथन समिती अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी आपापल्या गावाहून सरकारला जाब विचारायला उतरले आहेत. गेल्या एक आठवड्यापासून नाशिकहून निघालेले हे शेतकरी तब्बल 180 किमीचे अंतर आपल्या जिद्दीवर कापत मुंबईत पोहोचले आहेत. 

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय किसान सभेच्या झेंड्याखाली ही गर्दी विविध गावांतून मुंबईत धडकली. मोर्चेकर्‍यांची संख्या 12 ते 15 हजार असल्याचे पोलीस सांगतात. ही संख्या सोमवारी आणखी वाढू शकते. 
उत्साह वाढवणारी पारंपरिक वाद्ये आणि नृत्य - 

या मोर्चाचा उत्साह वाढत आहे तो शेतकर्‍याच्या पारंपरिक वाद्ये आणि नृत्यामुळे. लग्नामध्ये किंवा सण-समारंभामध्ये अशाप्रकारचे नृत्य आणि वादन शेतकरी बांधव करत असतात. त्याची झलक या मोर्चामध्ये पाहायला मिळाली. 

पावरी आणि भोपू या  परंपरागत वाद्याची कला एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे सोपवण्यात येत आहे. मोर्चा निघाला की ही वाद्ये वाजायला सुरुवात होते आणि मग शेतकरी बांधव या वाद्यावर ताल धरतात. शनिवारी रात्री मोर्चाचा मुक्‍काम ठाण्यातील जकात यार्डला होता. मोर्चेकर्‍यांची संख्या प्रचंड असूनही सकाळी उठल्यापासून ते पुढच्या दिशेने प्रस्थान करण्यापर्यंत कमालीची शिस्त पाहायला मिळाली. सकाळी आठ वाजता समूहाने नाश्ता करणारे महिला आणि पुरुष पुढच्या प्रवासाचे नियोजन करताना दिसले. आपल्या सहकार्‍यांना नाश्ता मिळाला की नाही याची सर्व जण एकमेकांकडे आवर्जून चौकशी करताना दिसले.