Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानसभेबाबत खडसेंचे तळ्यात-मळ्यात

विधानसभेबाबत खडसेंचे तळ्यात-मळ्यात

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:12AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध पवित्रा घेत खडसेंनी आधीच लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले असून विधानसभा निवडणूक लढवायचे की नाही याबाबतही त्यांनी संदिग्धता व्यक्त केली आहे.

भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी मंत्रीपदावरुन दूर केल्यापासून एकनाथ खडसे हे भाजपच्या सक्रीय राजकारणातून बाजूला फेकले गेले आहेत.

खडसेंना बाजूला करुन त्यांचे प्रतिस्पर्धी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना राज्याच्या राजकारणात महत्वाच्या जबाबदार्‍या देत उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे महत्व वाढविण्यात आल्याने खडसे अस्वस्थ आहेत. जळगाव आणि धुळे महापालिकेत महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने विजय मिळविला असून अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत कमी जागा असूनही महाजन यांनी भाजपचा महापौर विराजमान केला.

रावेरमधून रक्षा खडसें ऐवजी गिरीष महाजन यांच्या पत्नी साधना महाजन किंवा महाजन यांच्या विश्‍वासू नेत्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडसेंनी सावध पवित्रा घेत लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे ते म्हणाले. मधल्या कालखंडामध्ये मी जे अनुभवले त्यावरुन मला राजकारणाची घृणा वाटू लागली आहे. सत्ताधार्‍यांमध्ये दु:ख केवळ माझ्याच वाट्याला आल्याचे सांगत विधानसभेची निवडणूक लढवायची की नाही ते अजून ठरवले नसल्याचेही त्यांनी सांगितले.