Thu, Aug 22, 2019 04:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकनाथ खडसे यांना काँग्रेसचीही ऑफर !

नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच: अशोक चव्हाण

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:50AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजपचे नाराज नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही ऑफर दिली आहे. नाथाभाऊ  काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे. ते भाजपात नाराज असतील आणि त्यांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा असेल तर आम्हालाही विचार करता येईल. ते काँग्रेसमध्ये आले तर आम्हाला आनंदच होईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.

भाजपमधील अन्य मंत्र्यांना क्‍लीनचीट देण्यात आली असताना आपल्याला चौकशीच्या फेर्‍यात अडकविण्यात आल्याने एकनाथ खडसे अस्वस्थ आहेत. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांचे पुनरागमन अनिश्‍चित आहे. एकनाथ खडसे यांना न्या. झोटिंग समितीने क्‍लीनचीट दिली आहे. मात्र, खडसे यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू असल्याने झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात विधानसभेत सभेत सांगितले. त्यामुळे खडसेंच्या नाराजीत जास्तच भर पडली आहे. नाराज खडसेंना आपल्या पक्षात ओढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली आहे. 

गेल्या आठवड्यात जळगाव येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीकडूनही खडसेेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हवा देण्यात आली होती. पण, नंतर स्वतः खडसे यांनीच राष्ट्रवादी प्रवेशाचं खंडण केले. आता अशोक चव्हाण यांनी खडसेंना काँग्रेस प्रवेशाची आमंत्रण दिले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.