होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकनाथ खडसे यांचा ब्लॉग: आठवणीतील भाऊसाहेब फुंडकर

ब्लॉग: आठवणीतील भाऊसाहेब फुंडकर

Published On: May 31 2018 6:08PM | Last Updated: May 31 2018 7:25PMभाऊसाहेब फुंडकर पक्षादेश शिरसावंद्य मानणारा नेता- माजी महसूलमंत्री आ.एकनाथ खडसे
 

राजकारणासोबतच पारिवारिक संबंध दृढ असलेल्या, विदर्भीय राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कृषिमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त ऐकून धक्काच बसला. आज एक सच्चा मित्र, सच्चा स्नेही आणि चांगला मार्गदर्शक आम्हाला सोडून गेला आहे. राजकारणात कार्यरत असताना भाऊसाहेबांच्या आदर्शवत व्यक्तिमत्त्वाकडून घेतलेल्या गुणांमध्ये सर्वात महत्त्वाचा गुण मला मिळाला तो म्हणजे पक्षादेश कोणताही असो, बाजूचा असो की विरोधातला असो तो शिरसावंद्य मानून अगदी सहजतेने स्वीकारायचा. भाऊसाहेबांसारखा कुशल राजकारणी, लढवय्या नेता निघून गेल्याने आज भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली आहे.

भाऊसाहेबांसोबत संपर्क जुळला तो जनता राजवटीपासूनच म्हणजे 1978 पासून. माझ्यासह दयाराम चांगले पाटील, अर्जुनराव वानखेडे, प्रमिलाताई कोकणे आदी सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत होतो. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगून आल्यावर भाऊसाहेबांनी प्रथमच कोथळीला भेट दिली. या भेटीने आमच्यातील ऋणानुबंध अधिकच दृढ केले. अवघ्या पस्तीशीमध्ये भाऊसाहेब आमदार झालेले असल्याने, युवकांची भलीमोठी फौज त्यांच्या पाठीशी  सदैव असायची. 1980 ते 90च्या कालखंडात झालेल्या बऱ्याच चळवळी आणि आंदोलनामध्ये मी भाऊसाहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली सहभागी झालो होतो. सन 1990 च्या निवडणुकीत भाऊसाहेब खासदार म्हणून दिल्लीत गेले आणि मी पहिल्यांदाच काँग्रेसला बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या  मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून येऊन विधानसभेवर गेलो. भाऊसाहेब दिल्लीत असले तरी आमच्या संबंधांमध्ये त्यांनी कधीही अंतर पडू दिले नाही. कापूस उत्पादक आणि भाऊसाहेब फुंडकर हे एक समीकरणच होते. फेडरेशनचे अध्यक्ष असताना कापूस उत्पादकांच्या समस्यांविषयी ते तळमळीने विचार करीत असत. कापूस उत्पादकांच्या विकासासाठी, त्यांच्या उत्कर्षाकरिता अजून काय करता येईल यासाठी भाऊसाहेब सातत्याने प्रयत्नशील असायचे.

प्रमोदजी महाजन, भाऊसाहेब, गोपीनाथजी मुंडे आणि मी असा एक ऋणानुबंधच या काळात जुळला होता. आमचे संबंध केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता पारिवारिक संबंध होते. आम्हा चौघांचेही एकमेकांच्या परिवारावर जिवापाड प्रेम होते. माझ्या जीवनात मानसिकरित्या व्यथीत होण्याचा दुःखद प्रसंग म्हणजे स्व.निखिलचे आम्हाला सोडून जाणे. त्यावेळी भाऊसाहेब केवळ सात्वंनासाठी न येता कोथळी येथील निवासस्थानी थांबूनच राहिले होते. आम्ही चौघे कोणाचाही वाढदिवस, विवाह सोहळा किंवा अन्य कोणताही कार्यक्रम असला तरी एकत्रितपणेच साजरा करीत असू. भाऊसाहेबांमध्ये आणि माझ्यात आणखी एक ऋणानुबंध आहे तो म्हणजे आम्हा दोघांची सासुरवाडी ही बुलढाणा जिल्ह्यातील एकाच गावाची. गेल्या काही कालावधीत आम्ही दोघे हि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यरत होतो.
 
भाऊसाहेब विदर्भाच्या विकासासाठी नेहमी आग्रही असायचे. याबाबतीत मला एक किस्सा आठवतो तो म्हणजे सत्तेत असताना माझ्याकडून त्यांनी ढोरबगाव सिंचन प्रकल्प, वान प्रकल्प आग्रहाने मंजूर करवून घेतला होता. ढोरबगाव सिंचन प्रकल्पाच्या भूमिपूजनाप्रसंगी संध्याकाळ झाल्याने, अंधारामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण होवू शकत नव्हते. त्यामुळे त्यादिवशी जेवणानंतर रात्री दीड दोन वाजेपर्यंत आम्हा तिघांची रंगलेली मैफल एक सुखद आठवण म्हणून स्मृतीपटलावर आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी विनातक्रार सांभाळणे आणि पक्षादेश कायम शिरसावंद्य मानणे हा भाऊसाहेबांचा फार महत्त्वाचा गुण होता. भाऊसाहेब विरोधी पक्षनेतेपदी असताना पक्षाला त्यांच्याऐवजी विनोद तावडेंना संधी द्यायची होती. अशावेळी भाऊसाहेबांना हे कोण सांगणार? हा प्रश्न सर्वांपुढेच होता. पण ही जबाबदारी माझ्याकडे आली. मी भाऊसाहेबांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितले की, ‘भाऊसाहेब, पक्षाचा आदेश आहे की आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा.’ यावर भाऊसाहेबांनी ‘कधी देवू, आत्ता?’ असा प्रतिप्रश्न् मला केला. पक्षादेश अतिशय सहजतेने पाळून मानाचे पद त्यागणारे भाऊसाहेबाचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी आदर्शवत असेच आहे.

एकदा पक्षाकडून आपल्यावर अन्याय होत आहे या भावनेतून गोपीनाथजी खूप अस्वस्थ होते. त्यावेळी साहजिकच त्यांची समजूत घालण्याची जबाबदारी भाऊसाहेबांसह माझ्याकडे पक्षाने सोपवली. आम्ही मुंडे साहेबांकडे जावून त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करु लागलो, एका प्रसंगी मुंडेसाहेब एकदम चिडले मात्र त्यावेळी भाऊसाहेबांनी शांतपणे त्यांची समज घालत त्याचदिवशी त्यांना औरंगाबाद येथून मुंबईला आणून या प्रकरणावर पडदा टाकला. राजकारणात कार्यरत असताना भाऊसाहेबासोबतच्या अनेक आठवणी आज डोळ्यासमोर जात आहेत.

पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी भाऊसाहेबांनी अगदी सक्षमपणे पेलली आहे. मुंडेसाहेबांच्या संघर्ष यात्रेदरम्यान खान्देशची जबाबदारी माझ्याकडे तर विदर्भाची जबाबदारी भाऊसाहेबांकडेच होती. प्रदेशाध्यक्षपद असो की मंत्रीपद कुठलाही बडेजाव न बाळगणारा अत्यंत निगर्वी, प्रचंड मेहनती आणि सर्वात म्हणजे ज्येष्ठ असूनही मंत्रीपद नाही म्हणून कधीही अस्वस्थ नसणारा हा अफाट कर्तृत्वाचा धनी असणारा सर्वसामान्यांचा असामान्य व्यक्तिमत्वाचा धनी निघून गेला. त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम!