Tue, May 21, 2019 23:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभियांत्रिकीच्या 8500 जागा घटल्या

अभियांत्रिकीच्या 8500 जागा घटल्या

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 1:45AMमुंबई : प्रतिनिधी

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी यंदा तब्बल 8 हजार 500 जागा घटल्या आहेत. गेल्यावर्षी 1 लाख 38 हजार 226 जागा होत्या यंदा मात्र राज्यभरात 1 लाख 29 हजार 702 जागा असणार आहेत. गतवर्षी 56 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.

राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटीच्या निकालानंतर आता प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. गेल्यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाअभावी 56 हजार 940 जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यापैकी 19 महाविद्यालयांना अभ्यासक्रमांसाठी पुढे मान्यताच मिळाली नसल्याने बहुतांश जागा यंदा घटल्या आहेत, त्याचबरोबर अपुरे विद्यार्थी, सुविधांची कमतरता अशामुळेही महाविद्यालयांनी मान्यतेसाठी पुढे न आल्याने यंदा 8 हजार 524 जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा 347 महाविद्यालयात 1 लाख 29 हजार 702 जागा यंदा उपलब्ध आहेत.  गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रमांना एवढी प्रचंड मागणी होती, की विद्यार्थी मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेशासाठी धन्यता मानायचे. उपलब्ध जागांपेक्षा कितीतरी जास्त अर्ज यायचे गेल्या चार वर्षापासून मात्र रिक्त जागांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे.  अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे विद्यार्थीच फिरकत नाहीत असे चित्र आहे. त्यामुळे खासगी संस्थाचालकांनी आता अनेक महाविद्यालये बंद करण्याकडे कल वाढला आहे. एआयसीटीईने एनबीए प्रमाणपत्र, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा याबाबत अनेक बंधने घातली आहेत. यापूर्वी केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशाने अनेक महाविद्यालयांनी जागा भरमसाठ वाढवल्या. त्या नियंत्रणात आणून प्रवेश होत नाहीत त्या जागा कमी करून एकूण प्रवेश क्षमता आणि प्रत्यक्षात असलेली मागणी याचे वास्तव लक्षात घेत आता जागा कमी केल्या जात आहेत. याचाच फटका बसल्याने 8 हजार जागा यावर्षी कमी झाल्या आहेत.  एआयसीटीईनेही कडक नियम घातल्याने रिक्त जागा राहणारे महाविद्यालये प्रवेशातून आपले अंग काढून घेत आहेत. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी पदवी प्रवेशाच्या जागा घटल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातून देण्यात आली.