Sat, Sep 22, 2018 23:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईची आठ पोलीस ठाणी महिलांच्या हाती!

मुंबईची आठ पोलीस ठाणी महिलांच्या हाती!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अतिरेक्यांच्या कायम टार्गेटवर असलेल्या मुंबईतील काही अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांसह आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकार्‍यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. एखाद्या पोलीस ठाण्याची संपूर्ण जबाबदारी महिलांकडे देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले असून हा ऐतिहासिक निर्णय घेऊन मुंबई पोलिसांनी महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन दिले आहे.

समुद्रमार्गे शहरामध्ये घुसून करण्यात आलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. हल्ल्यानंतर शहराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देत, प्रशासन तसेच पोलिसांकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या अशा कुलाबा पोलीस ठाण्याची जबाबदारी रश्मी जाधव यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. कुलाब्यापाठोपाठ महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील अशा एअरपोर्ट पोलीस ठाण्याची  जबाबदारी अलका मांडवी यांच्या खांद्यावर, तर लता शिरसाट या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या सहार पोलीस ठाण्याच्या येत्या काळात इनचार्ज असणार आहेत. 

वांद्रे-कुर्ला संकुलातील पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक म्हणून कल्पना गडेकर या कर्तव्य बजावत असून रोहिणी काळे यांच्याकडे पंतनगर पोलीस ठाणे आणि विद्यालक्ष्मी हिरेमठ यांच्याकडे आरे पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सायन पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड सांभाळत असून येत्या काळात ज्योत्स्ना रसम या गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अशाप्रकारे तब्बल आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी पहिल्यांदाच या आठ कर्तव्यदक्ष महिला अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलात काम करत असलेल्या महिला अधिकार्‍यांना हा सन्मान देऊन  महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्याचे काम मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून ही माहिती दिली असून अनेकांनी याचे स्वागत केले आहे.

Tags : mumbai, mumbai news, Eight police station, Mumbai,  women hand,


  •