होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्ती

अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्ती

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 1:57AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शिक्षकांची शाळाबाह्य कामे बंद करून शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या 12 व्या द्वैवार्षिक अधिवेशनात मुंबईतील दहिसर येथे ते बोलत होत. 

शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून शालेय शिक्षण, ग्राम विकास, नगरविकास, महसूल व इतर खात्यातील मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. सकाळी अधिवेशनाचे उदघाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आमदार मनीषा चौधरी, आमदार नागो गाणार, संजीवनी रायकर उपस्थित होत्या. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, अधिवेशन प्रमुख अनिल बोरनारे, संयोजक शिवनाथ दराडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

तावडेंनी घेतला शिक्षकांचा तास 

या अधिवेशनाला राज्यासोबतच मुंबईतील शिक्षक उपस्थित होते. अधिवेशनाच्या सभा मंडपात जाऊन शिक्षकांशी शिक्षणमंत्र्यांनी संवाद साधला व शालार्थ, अशैक्षणिक कामे, जुनी पेंशन, अतिरिक्त शिक्षक व इतर सर्व विषयांवरील प्रश्नांना उत्तरे देत राज्याच्या शैक्षणिक धोरणांची  माहिती देऊन लवकरच शिक्षणाला देशात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून या कामात शिक्षक समर्पित भावनेने काम करीत असल्याचे सांगितले.