Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाल नचिकेतातील मजकुरांचे खापर समितीवर

बाल नचिकेतातील मजकुरांचे खापर समितीवर

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:24AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत निवडलेल्या पुस्तकांमधील आक्षेपार्ह मजकुराशी आपला संबंध नाही. पुण्यातील महाराष्ट्र विद्या प्राधिकारण यांच्यामार्फत पूरक वाचन पुस्तक योजनेतंर्गत नेमलेल्या आशय समितीकडून या पुस्तकांची निवड करण्यात आली असल्याचे सांगत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला आहे.    

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन बाल नचिकेता या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह मजकुर असल्याचा आरोप केला होता. त्यावर तावडे यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारवरील आरोप फेटाळुन लावले.

तावडे म्हणाले,  विखे-पाटील यांनी दाखविलेले बाल नचिकेता हे पुस्तक जुने असून ते कुंभमेळ्यामध्ये वाटण्यात आले होते. त्या पुस्तकांतील मजूकर विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकामध्ये समाविष्ट नाही.  तरीही या पुस्तकांमधील मजुकरावर तज्ञांचा सल्ला घेतला जाईल. त्यांनी शिफारस केल्यास आक्षेपार्ह मजकूर रद्द केला जाईल, अशी सारवासारवही तावडे यांनी केली.

पुस्तकांच्या वाढीव किंमतीवर विखे पाटील यांनी घेतलेला संशय तावडे यांनी खोडुन काढला. ते म्हणाले, विखे यांनी दाखविलेले पुस्तक लहान आकाराचे व ब्लॅक आणि व्हाईट होते. होते. त्याची किंमत 20 रुपये होती. पण आता छापलेले पुस्तक रंगीत व मोठ्या आकारचे आहे. तसेच त्यासाठी वापरलेला कागद दर्जेदार असल्यामुळे त्याची किमत 50 रुपये आकारण्यात आली आहे.

एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेतंर्गत समितीने निवडलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सुमारे 3 लाख 50 हजार पुस्तके, डॉ.एपीजे अब्दुल कलाम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांच्या जीवनावरील सुमारे 2 लाख पुस्तक, छत्रपती शाहू महाराज यांची सुमारे 2 लाख पुस्तके यांच्यासह स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी यांच्यासह संत कबीर, संत मिराबाई, संत एकनाथ, संत नामदेव आदींची ही पुस्तके समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शीर्षकाची लाखो पुस्तके खरेदी करण्यात आलेला विरोधकांचा दावा निराधार असल्याचा टोला तावडे यांनी लगावला.