Sat, May 25, 2019 23:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वांगचुक, डॉ. वाटवानींनी ब्रँड अ‍ॅम्बॅसॅडर म्हणून काम करावे

वांगचुक, डॉ. वाटवानींनी ब्रँड अ‍ॅम्बॅसॅडर म्हणून काम करावे

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रात काळानुरूप बदल घडवून, येणार्‍या काळात या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानी यांच्यासारख्यांची महाराष्ट्राला गरज आहे. समाजातील प्रत्येकामधील भावनिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्राचे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून काम करावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी केले.

आशियातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा 2018 साठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार यंदा शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी या दोन भारतीयांना जाहीर झाला. याबद्दल शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार विजेत्यांचा सत्कार ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे झाला. 

सोनम वांगचुक म्हणाले की, शिक्षणात सुधारणा होणे ही काळाची गरज आहे. मुलांना देण्यात येणारे शिक्षण भौगोलिक स्थितीवर बरेचसे अवलंबून असते. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी सांघिक प्रयत्न करताना मातृभाषेतून शिक्षण घ्यावे यासाठी आपण आग्रही असणे आवश्यक आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना बदलत्या शिक्षणपद्धतीप्रमाणे बदल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. भरत वाटवानी म्हणाले की, सुरुवातीला वेगळे काम करीत असल्याने त्रास झाला; पण समाजात राहणार्‍या एका व्यक्‍तीला तरी आपण बरे करू शकलो पाहिजे, या विश्‍वासाने काम सुरू केले. आज वेगवेगळे आजार अनेकांना होतात; पण अजूनही आपण मानसिक आजाराचे रुग्ण आहोत, हे आपण पटकन मानायला तयार होत नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मानसिक आजाराबाबत धडे देणे, विद्यार्थ्यांना या आजाराबाबत पूर्ण माहिती देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

सोनम वांगचुक

लडाखमधल्या दुर्गम भागात काम केले आहे. निसर्ग, संस्कृती,विज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांनी लडाखच्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले, पाणी टंचाईवर मात करणारे आईस स्टुपा बनवले, लाखो मुलांना प्रयोग करण्याची प्रेरणा दिली आहे. 

डॉ. भरत वाटवानी

कफल्लक होऊन रस्त्यावर भटकणार्‍या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यावर मोफत उपचार केले व त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणली. डॉ. भारत वाटवानी आणि त्यांच्या पत्नी कफल्लक झालेल्या रस्त्यावर भटकणार्‍या मनोरुग्णांना आपल्या खासगी क्लिनिकमध्ये घेऊन यायचे. त्यांच्यावर मोफत उपचार करायचे. डॉ. वाटवानी यांनी अशा रुग्णांना मोफत अन्न पाणी आणि आश्रय दिला.