Thu, Apr 25, 2019 18:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरोग्यपूर्ण जीवनासाठी ‘एक चमचा कमी खा’

आरोग्यपूर्ण जीवनासाठी ‘एक चमचा कमी खा’

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 17 2018 1:26AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

धकाधकीचे जीवन, त्यामुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मुंबईकर नेहमीच त्रस्त असतात. मुंबईकरांना आरोग्यदायी जीवन जगण्याबाबत डॉक्टर्समंडळी त्यांच्यापरीने समुपदेशन करत असतात. आता मुंबई महापालिकाही यात मागे राहिलेली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मुंबईकरांना सध्या ‘एक चमचा कमी खा’ असे आवाहन केले जात आहे. त्यानुसार, रोजच्या आहारातून मीठ, साखर आणि तेल यांचे सेवन किमान एका चमच्याने कमी करावे, असा सल्‍ला महापालिका देत आहे. असंसर्गीय आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका पावले उचलत आहे. 

यासाठी मुंबई महापालिका काही सार्वजनिक ठिकाणांचाही वापर करणार आहे. शहरासह उपनगरांतील सुमारे 50 बसस्टॉपच्या छपरांवर याबाबत फलक लावले जाणार आहेत. तर रेल्वेस्थानकांच्या परिसरातही असे फलक लावले जातील. बसस्टॉप आणि रेल्वेस्थानकांच्या परिसरात केलेल्या जनजागृतीला प्रतिसादही मिळतो, हे लक्षात घेत महापालिका अशा स्थळांची निवड लवकरच करणार आहे.
मुंबई महापालिकेने एप्रिल महिन्यात मृत्यूदरविषयक सर्वेक्षण केले होते. यानुसार, गेल्या 2 वर्षांत मुंबईतील विविध रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये दाखल 74 लाख नागरिकांना विविध आजारांनी त्रस्त करुन सोडले. यात 23 टक्के रुग्णांना मधुमेह झाला होता, तर तेव्हढेच टक्के नागरिक ताणतणावाखाली होते.

यामुळे मुंबईकर पडतात आजारी

यासंदर्भात, महापालिकेच्या कार्यकारी आरोग्याधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या की, मुंबईकरांत निष्क्रिय पातळी जास्त असते. अनेकजण मोबाईल फोनवर किंवा टीव्ही बघण्यात सतत मग्‍न असतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. आजार टाळण्यासाठी रोजचा व्यायाम आणि आहारावरील नियंत्रणही गरजचे आहे. रुग्णांनी साखर, मीठ आणि तेलाच्या सेवनात घट केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात, असा अनुभव आहे. 

भारतातील आजारांची टक्केवारी

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, भारतात 61 टक्के नागरिक हे असंसर्गीय आजारांचे शिकार होतात. 45 टक्के नागरिक हृदयरोग आणि रक्‍तवाहिन्यांशी संबंधित आजारांना बळी पडतात. श्‍वसनाच्या आजारांमुळे 22 टक्के, 12 टक्के कर्करोगामुळे, मधुमेहामुळे 3 टक्के नागरिक मृत्युमुखी पडतात. साखर, मीठ आणि तेलाचे सेवन कमी केल्यास अशा आजारांशी लढण्याची ताकद तर मिळतेच, शिवाय लठ्ठपणाही कमी होतो.